कोंढव्यात वेबसाईटद्वारे हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी; पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 02:13 PM2020-05-14T14:13:08+5:302020-05-14T14:16:06+5:30
हुक्का पॉर्लरवर बंदी असताना वेबसाईटवर हुक्क्याची जाहिरात
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना तसेच हुक्का पॉर्लरवर बंदी असताना वेबसाईटवर हुक्क्याची जाहिरात करुन घरपोच डिलिव्हरी देणार्या तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
मित विजय ओसवाल (वय १९, रा. वानवडी बाजार), रॉयल जयराम मधुरम (वय २८, रा.लुल्लानगर, कोंढवा) आणि परमेश महेश ठक्कर (वय २४, रा. भवानी पेठ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ हुक्का पॉट, ६ तंबाखुजन्य फ्लेवरची पाकिटे, ४ मोबाईल फोन व २ मोपेड असा ८४ हजार १००रुपयांचा माल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांना व्हॉटस हॉट या वेबसाईटवर मोबाईल नंबर टाकून हुक्क्याची जाहिरात केली जात असून हुक्का विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त शिवाजीपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन माहिती काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महाडिक, हवालदार मगर, गुरव, गरुड, साबळे
आणि चौधर यांनी बनावट ग्राहकांच्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधला.त्यांना कोंढव्यातील लुल्लानगर येथील लुल्ला गार्डनजवळ बोलविण्यात आले. तेथे पोलिसांनी सापळा रचला. तेव्हा हुक्का विक्रीसाठी आलेल्या तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र कोविड १९ नियम, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ नुसारतसेच १८८, २६९, २७०, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.