पुणे मराठी ग्रंथालयाची घरपोच सेवा योजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:38+5:302020-12-03T04:19:38+5:30
पुणे : जे वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा ज्येष्ठ वाचनप्रेमी मंडळींपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी पुणे मराठी ग्रंथालयाने घरपोच सेवा ...
पुणे : जे वाचक पुस्तकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा ज्येष्ठ वाचनप्रेमी मंडळींपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी पुणे मराठी ग्रंथालयाने घरपोच सेवा योजना सुरू केली आहे. ग्रंथालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या योजनेचा लाभ घेतलेल्या ३५ वाचकांसाठी पुस्तके कर्मचा-यांकडे हस्तांतरित करण्यात आली.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली ग्रंथालये सुरू झाली असली तरी ज्येष्ठ नागरिकांना ग्रंथालयात येणे शक्य होत नाही. अशा वाचनप्रेमी नागरीकांसाठी ही अत्यंत किफायतशीर योजना आहे, असे ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष धनंजय बर्वे यांनी सांगितले. ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद मंगेश अनगळ आणि कर्मचारीवर्ग यांच्या प्रयत्नांमुळे या योजनेस मूर्त स्वरूप आले. माफक शुल्क आकारून घरपोच सेवा देणा-या या योजनेतील सभासदांना १५ दिवसातून एकदा दोन पुस्तके देण्यात येणार आहेत. निर्जंतुकीकरणाचे सर्व निकष योग्य पद्धतीने पाळून पुस्तके हाताळली जात आहेत.
घरपोच सेवा योजनेमध्ये ३५ वाचकांनी सहभाग घेतला असून, आणखी ७५ जणांनी नावनोंदणी केली आहे. ६८ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यामध्ये ज्येष्ठ महिलांची संख्या मोठी आहे. या योजनेमुळे करोनाची धास्ती असताना ग्रंथालयामध्ये येण्या-जाण्याचा वेळ वाचणार आहे. दुचाकीने येणा-यांना गाडी कोठे लावायची या समस्येपासूनही वाचकांची मुक्तता झाली आहे, असे ग्रंथालयाचे सहकार्यवाह सुधीर इनामदार यांनी सांगितले.
............................