पुणे जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:35+5:302021-04-23T04:10:35+5:30
कुटुंबांतील महिलांचे दागिने गहाण ठेवत संसार चालविण्याची वेळ (अविनाश हुंबरे) सांगवी : कोरोनासारख्या महामारीच्या संकटात कायदा सुव्यवस्था अबाधित ...
कुटुंबांतील महिलांचे दागिने गहाण ठेवत संसार चालविण्याची वेळ
(अविनाश हुंबरे)
सांगवी : कोरोनासारख्या महामारीच्या संकटात कायदा सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी चोवीस तास पोलिसांच्या बरोबरीने रस्त्यावर उभे राहून गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. मात्र, त्यांचे अनेक बंदोबस्ताचे वेतन थकीत राहिल्याने त्यांचे संसार ऐन लॉकडाऊनमध्ये अडचणीत आले आहेत. प्रसंगी घर खर्च, दैनंदिन खर्च यासाठी घरातील महिलांचे दागदागिने घाण ठेऊन प्रसंगी उधार, उसनवार करत अनेकजण आपला घरप्रपंच चालवत आहेत.
राज्यातील सर्वच होमगार्ड जवानांची सध्या बिकट अवस्था निर्माण झाली आहे. यापुढे शासनाने होमगार्ड जवानांचे महिन्याला वेतन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. घरातील आई, पत्नी यांचे दागिने घाण ठेऊन संसार चालवण्याची वेळ आल्याने जवानांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाची सध्या विदारक परिस्थिती निर्माण होऊन त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे जवानांनी ‘लोकमत ’शी बोलताना सांगितले.
राज्यात सण, उत्सव, दंगलसदृश कालावधीत पोलीस दलाला सहाय्य करण्यास गृहरक्षक दलाचे जवान पुढे असतात. त्यांचे सातत्याने वेतन रखडत असल्याने त्यांचे हाल सुरू झाले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणूक दरम्यान बंदोबस्तातील टप्पा ३ चे अद्याप वेतन मिळाले नाही. तसेच भीमा कोरेगाव २०२० आणि कोरोना बंदोबस्तातील डिसेंबर २०२०, जानेवारी २०२१ असे एकूण ६० हजार ते ६५ हजार रुपये प्रमाणे प्रत्येक जवानांचे वेतन थकीत आहे. त्याचप्रमाणे ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनात वाढ देखील झाली नाही. तर सध्या ६७० रुपये प्रतिदिन वेतन त्यांना मिळत आहे. बारामती शहरासाठी ४०, बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात ३० तर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात २० जवान कार्यरत आहेत. तर जिल्ह्यात एकूण दीड हजारांच्या जवळपास जवान कार्यरत आहेत. तर त्यापैकी मोजक्या जवानांच्या हाताला काम मिळत आहे. यामधील काही जवान महाविदयालयीन शिक्षण घेत असून काही एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास देखील करत आहेत. थकीत वेतनामुळे उधारीवर घरातील रेशन आणून कर्जबाजारी व्हावे लागत आहे. यामुळे सध्या त्यांच्या संसाराची घडी विस्कटत चालली आहे. यामुळे त्यांना वेतनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जवानांची कामे करण्याची मानसिकता राहिली नसल्याचे सांगण्यात आले. अनेक जवानांवर आज थकीत वेतन व काहींना काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.