शिरसगावला वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:33 PM2018-10-03T23:33:19+5:302018-10-03T23:33:43+5:30
शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे झालेल्या वादळाने गावातील जि. प. शाळेचे तीन वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले, तर सुमारे १५० विजेचे खांब उन्मळून पडले
रांजणगाव सांडस : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे झालेल्या वादळाने गावातील जि. प. शाळेचे तीन वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले, तर सुमारे १५० विजेचे खांब उन्मळून पडले असून एका मुलीला दुखापत झाली आहे. शिरसगाव काटा परिसरात सोमवारी अचानक झालेल्या पावसाबरोबर आलेल्या वादळाने परिसरात धुमाकूळ घातला आहे. यावेळी वादळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेले. गावानजीक न्हावरे-इनामगाव रस्त्यालगत असलेले विद्युत रोहित्र पूर्णपणे जागीच उखडून पडून गेले आहे.
वादळात झालेल्या नुकसानीचा शासनाने तातडीने पंचनामा केला आहे. वादळात शिरसगाव काटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे शाळा चालू असतानाच उडून गेले. पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समितीच्या सभापती सुजाता पवार आणि शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वासनाना कोहकडे यांनी शाळेची पाहणी करून संबंधित अधिकाºयांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी कळमकर, इंजिनिअर पिसाळ, रावसाहेब पवार, नरेंद्र माने, सचिन पवार, सरपंच सतीश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विजय जगताप, माजी सरपंच संजय शिंदे, विकास जगताप, मोहन कदम, रामचंद्र केदारी, भाऊसाहेब गायकवाड, अशोक जाधव, विकास कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वादळात विद्युतवाहक तारा मोठ्या प्रमाणावर तुटल्या, तर सुमारे १००-१५० विद्युत खांब पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसगावमध्ये घिसाडी (लोहार) काम करून उदरनिर्वाह करणाºया कुटुंबातील मुलीला या वादळात घराचे पत्रे उडून लागल्याने दुखापत झाली आहे. या वादळात गावातील घरांची पडझड झाली असून फळबागा, पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. गावातील मंदिराच्या छताच्या संरक्षक बाजूची पडझड झाली असून सर्वत्र वादळाचा हाहाकार होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.