घरून आणलेल्या डब्यातला घास रस्त्यावरील कुटुंबांना ; कोंढवा वाहतूक पोलिसांचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 03:48 PM2020-03-27T15:48:06+5:302020-03-27T15:53:33+5:30
दरवेळी रागवणारे, इतरांवर हात उगारणारे, समज देऊनही न ऐकणाऱ्याना अद्दल घडविणारे गरज पडल्यास आपल्या लाठीचा प्रसाद देणारे पोलीस सर्वाना माहिती असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोंढव्यातील रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना आपल्या डब्यातील घास काढून देणाऱ्या पोलिसांनी खाकी वर्दीत दडलेल्या माणसुकीचे दर्शन घडवले आहे.
पुणे : दरवेळी रागवणारे, इतरांवर हात उगारणारे, समज देऊनही न ऐकणाऱ्याना अद्दल घडविणारे गरज पडल्यास आपल्या लाठीचा प्रसाद देणारे पोलीस सर्वाना माहिती असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोंढव्यातील रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना आपल्या डब्यातील घास काढून देणाऱ्या पोलिसांनी खाकी वर्दीत दडलेल्या माणसुकीचे दर्शन घडवले आहे. कोंढवा वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोबत आणलेल्या डब्यातील जेवण इतरांना देऊन अनोखा संदेश समाजात पोहचवला आहे.
कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात संचारबंदी जाहीर करण्यात आली. 14 दिवस लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याने सर्वांचे धाबे दणाणले. बहुतांशी नागरिकांनी किराणा मालाचा साठा करत येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली. मात्र यासगळ्यात हातावर पोट असणाऱ्या, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या व्यक्तींसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कोंढवा भागातील फेरीवाले, रस्त्यावर छोट्या मोठ्या वस्तू विकून गुजराण करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना मुलांच्या पोटाची खळगी कशी भरावी याचा प्रश्न पडला. शहरात सगळीकडे सामसूम, शुकशुकाट असल्याने कुठे काय मिळेल याची खात्री नव्हती. ही गंभीर परिस्थिती कोंढवा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी या रस्त्यावरील लोकांना जेवण देण्यास सुरुवात केली.
" एक डबा आमच्यासाठी सोबत आणलेले डबे तुमच्यासाठी" हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. आपल्या डब्यातील घास त्या लहान मुलांना भरवला. यामुळे त्या कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांचे आभार मानले. गेल्या दोन दिवसांपासून कोंढवा वाहतुक विभागातील 40 पोलीस कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. यात डब्यात येताना कुणी काय आणायचे याचे नियोजन केले जाते. एखादा पोलीस कर्मचारी चपात्या घेऊन येतो, तर कुणी भाजी घेऊन येतो, कुणी भात तर कुणी डाळ अशा पद्धतीने सर्वांनी यात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे हे सर्व पोलीस कर्मचारी या लोकांसोबत जेवायला बसतात. त्यामुळे पोलिसांच्या बद्दल त्यांच्या मनात असलेली प्रतिमा बदलण्यास मदत होणार आहे. संपुर्ण परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नॉर्मल त्या दोन्ही कुटुंबांची जबाबदारी कोंढवा वाहतुक विभागाने घेतली अाहे. याबरोबरच अनेक गरजु कुटुंब असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना शिधा किंवा धान्य वाटप करणार असल्याचे कोंढवा वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचारी यांनी सांगितले.
कोंढवा वाहतुक विभागा समोरील लहान मुले असणारी दोन कुटुंबाकडे चौकशी केली असता, त्यांचेकडे धान्य तसेच अन्य जीवनावश्यक साहित्याचा अभाव असल्याचे दिसून आले. यानंतर वाहतुक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या दोन्ही कुटुंबासाठी १५ दिवस पुरेल इतके धान्य दिले.तसेच त्यांना सद्यस्थितीत कशी काळजी घ्यावयाची हे समजावुन सांगुन, मास्क चे वाटप सुध्दा केले.
- वाहतूक पोलीस कर्मचारी (कोंढवा विभाग)