राज्याचे गृहमंत्री म्हणाले, "समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:17 PM2022-05-28T17:17:44+5:302022-05-28T17:19:48+5:30
‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...
पिंपरी : अमली पदार्थ बाळगल्याच्या, त्याचे सेवन केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने आर्यन खान याला क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे आरोपपत्रातून (चार्जशीट) आर्यन खानचे नाव वगळण्यात आले आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणी ‘एनसीबी’चे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
गृहमंत्री वळसे पाटील हे शनिवारी (दि. २८) चिंचवड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने अमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले.
गृहमंत्री वळसे पाटील याबाबत म्हणाले, आर्यन खान याच्यावर जे आरोप केले गेले होते त्याच्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे चार्जशीटमधून आर्यन खानचे नाव वगळले. मला अस वाटतं की केंद्राने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि संबंधिताविरुद्ध कारवाईची सूचना दिलेली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती भूमिका आमचीसुद्धा राहील. मला असे वाटते की, वानखेडे यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आहे त्याबाबत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
राणा दाम्पत्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाही-
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे. याबाबत विचारले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राणा दाम्पत्याचा आंतरराष्ट्रीय प्रश्न नाही. त्यामुळे त्याला एवढे महत्व द्यायची गरज नाही.