Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:37 PM2021-11-29T21:37:24+5:302021-11-29T21:37:42+5:30
प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यातील विषाणू हा ओमायक्रॉन आहे का यासाठी हा अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले जाणार
पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका प्रवाशावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, त्याला घरीच विलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यातील विषाणू हा ओमायक्रॉन आहे का यासाठी हा अहवाल प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़संजीव वावरे यांनी दिली़
दक्षिण आफ्रिकेतील कोव्हीड विषाणूच्या उत्परीवर्तीत प्रकाराचा ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन, महापालिकेने परदेशातून आलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह हॉंगकॉंग, ऑस्ट्रिया, झिंम्बाब्वे, जर्मनी, ईस्त्राईल या देशातून कोण नागरीक आले आहेत का, याची माहिती सध्या महापालिका गोळा करीत आहे़
जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेनेही शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले असून, विमानतळ प्रशासनाकडून पुण्यात या देशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे. यात एक नागरीक वीस दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आला असून, त्याचा शोध लागला आहे़ त्यामुळे त्याला त्याचा तपासणी अहवाल येइपर्यंत पुढील आठ ते दहा दिवस घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ज्या देशांमध्ये हा विषाणू आढळून आला त्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही
दरम्यान ज्या देशांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे, त्या देशातून पुण्यात येण्यासाठी थेट विमान सेवा नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या भारतातील शहरातुन पुण्यात आलेल्यांची माहीतीही गोळा केली जात आहे. शहरात गेल्या आठवड्यात दैनंदिन रूग्ण संख्या शंभरच्या आत असली तरी पूर्वीपेक्षा ती वाढलेली आहे. तसेच तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी (शंभरापैकी एकूण रूग्ण) दीड टक्क्यांवरून पुन्हा अडीच टक्क्यांपर्यंत गेली आहे. मात्र ही वाढ हा संसर्गातील चढउतार असतोच त्यामुळे लागलीच शहरात कोरोना संसर्ग वाढला आहे असे म्हणता येणार नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.