पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल साडेपाच पटींनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 10:02 AM2022-07-06T10:02:55+5:302022-07-06T10:03:06+5:30

देशभरातील आघाडीच्या आठ मेट्रो शहरांच्या क्रमवारीत अहमदाबादनंतर पुण्याचा क्रमांक लागतो

Home sales in Pune increase by a whopping five and a half times | पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल साडेपाच पटींनी वाढ

पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल साडेपाच पटींनी वाढ

googlenewsNext

पुणे : कोरोनानंतरच्या काळात घर खरेदी करणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य आल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल साडेपाच पटींनी वाढ झाली आहे. वाढलेली महागाई, गृहकर्जाचे वाढलेले दर, तसेच बांधकाम साहित्याचे गगनाला भिडलेले दर यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत घरांच्या किमतीही वाढल्या असल्या तरीही ही मागणी वाढल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशभरातील आघाडीच्या आठ मेट्रो शहरांच्या क्रमवारीत अहमदाबादनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या आठही शहरांमध्ये घरांना मागणी वाढली असून नवीन पुरवठाही वाढल्याचे चित्र आहे.

अहमदाबादनंतर पुण्यात सर्वाधिक विक्री

प्रापटायगर या संस्थेच्या रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल- एप्रिल-जून २०२२ या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार देशातील मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, पुणे, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या आघाडीच्या आठ निवासी जागांच्या बाजारपेठांचा अभ्यास तसेच नवीन पुरवठा, विक्रीची स्थिती, जागांचे दर याचा अभ्यास करण्यात आला. या अहवालानुसार २०२२च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या तिमाहीत ७० हजार ६२० घरांची विक्री झाली, तर दुसऱ्या तिमाहीत ७४ हजार ३३० घरांची विक्री झाली. तर गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तुलनेत अहमदाबादनंतर पुण्यात सर्वाधिक विक्री झाली आहे. पुण्यात २०२१च्या दुसऱ्या तिमाहीत २५०० घरांची विक्री झाली होती. तर २०२२च्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल १३ हजार ७२० घरांची विक्री झाली आहे. ही वाढ सुमारे साडेपाच पटींची आहे. घरांच्या एकूण संख्येचा विचार करता मुंबईत २६ हजार १५० घरांची विक्री झाली. त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतो.

पुण्यात वाढले घरांचे दर

दुसरीकडे घरांच्या किमतीतही वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यानुसार पुणे व चेन्नई आघाडीवर असून येथे सुमारे ९ टक्क्यांनी घरे महागली. पुण्यात घरांचे सरासरी दर ५४०० ते ५६०० रुपये प्रति चौरस फूट इतके नोंदवले गेले. त्यानंतर अहमदाबादमध्ये ८, तर मुंबईत ६ टक्के दरवाढ झाली आहे. मालमत्तेच्या किमतींमध्ये झालेल्या या वाढीचा घर खरेदी करणाऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही असे दिसून येत आहे. कोरोनासाथीनंतरच्या टप्प्यातील एकूण आर्थिक चित्र व उत्पन्नाच्या स्थैर्यात झालेली सुधारणा यामुळे हा बदल झाल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यातही वाढ झाली असून, २०२१च्या तुलनेत यंदा पुण्यात १३ हजार ३९० घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तर मुंबईत ४३ हजार २२० घरे उपलब्ध झाली आहेत.

''याबाबत प्रॉटायगरचे सीएफओ विकास वाधवान म्हणाले, “या काळात गृहकर्जे प्रामुख्याने परवडण्याजोगी राहिली आहेत. स्वत:च्या मालकीचे घर असण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक परिस्थितीबाबतचा आत्मविश्वास व उत्पन्नातील स्थैर्य यांची त्याला जोड मिळाली आहे.”

''कोरोनानंतर बहुतांश लोकांना स्वत:ची जुनी घरे कमी पडू लागली. त्यामुळे मोठ्या घरांचे महत्त्व कळले आहे. त्यातच वर्क फ्रॉम होम असल्याने आयटी क्षेत्रातील नोकरदारांना पुन्हा नोकऱ्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बजेट वाढले आहे. तसेच गृहकर्जांच्या दरांतही मोठी घट झाली. त्यामुळे अनेकांना घरे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाली आहेत. - आदित्य जावडेकर( उपाध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो)'' 

Web Title: Home sales in Pune increase by a whopping five and a half times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.