पुण्यात गृहघोटाळा; २०० कोटींची फ्लॅटविक्री, 'भटक्या विमुक्त'च्या नावाखाली मिळविली जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:45 PM2022-03-16T14:45:57+5:302022-03-16T14:46:36+5:30
परस्पर सदनिका विक्रीस नव्हती परवानगी....
पुणे: भटक्या विमुक्तांसाठी बांधलेल्या गृहरचना प्रकल्पातील फ्लॅट परस्पर विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गृहप्रकल्पच लाटण्याच्या नव्या 'आदर्श'मध्ये २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. याबाबत सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवावर गुन्हा दाखल झाला आहे.
वारजे माळवाडी येथे शासनाने भटक्या विमुक्त समाजाच्या गृहरचना प्रकल्पासाठी साडेचार एकर जमीन दिली होती. त्यावर ३९६ फ्लॅट बांधण्यात आले. त्यापैकी २१८ सभासदांना फ्लॅट न देता त्यांची परस्पर विक्री करून सुमारे २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अंबादास दत्तात्रय गोटे (वय ७०, रा. आशीर्वाद गार्डन सोसायटी, शिवणे) आणि सचिव गणेश बजरंग माने (वय ४२, रा. जोशी वाडी, शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९९० ते मार्च २०२२ दरम्यान वारजे माळवाडी येथील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीत घडला आहे.
याप्रकरणी दीपक अशोक वेताळ (वय ४०, रा. गंधर्वनगरी, मोशी यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भटक्या विमुक्त समाजातील लोकांना घरे मिळावीत, यासाठी रामनगर सहकारी गृहरचना संस्थेची स्थापना करण्यात आली. २१८ जण सभासद होते. त्यांच्याकडून वेगवेगळ्या रकमा घेण्यात आल्या.
संस्थेला शासनाने २०१० मध्ये वारजे येथे १ हेक्टर ७६ आर. जमीन दिली. गोटे हे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी इतरांच्या मदतीने ३९८ फ्लॅट बांधले. ते रामनगर सोसायटीच्या मूळ २१९ सभासदांना न देता इतर लोकांना शासनाच्या परवानगीशिवाय विक्री करून मूळ सभासद व शासनाची अंदाजे २०० कोटी रुपयांची फसवणूक केली.
आर्थिक गुन्हे शाखेकडे याची तक्रार आल्याने त्यांनी चौकशी केली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.
परस्पर सदनिका विक्रीस नव्हती परवानगी-
एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारती बांधून घेण्यात आल्या. संस्थेच्या सभासदांना हे फ्लॅट देणे अपेक्षित होते. परंतु शासनाची कोणतीही परवानगी न घेता ३९६ सदनिका बांधल्या. त्यातील केवळ १० सदनिका भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना दिल्या. उरलेल्या सदस्यांना सदनिका न देता त्यांची परस्पर विक्री केली.