बारामतीत गृह अलगीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:31+5:302021-04-08T04:10:31+5:30
बारामती : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बारामतीमध्ये येत्या काही दिवसांत खाटांची कमतरता भासू नये म्हणून त्यामुळे बारामतीमध्ये ...
बारामती : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बारामतीमध्ये येत्या काही दिवसांत खाटांची कमतरता भासू नये म्हणून त्यामुळे बारामतीमध्ये गृह अलगीकरणास सुरूवात केली आहे. सध्या गृह अलगीकरणात २९० रुग्ण आहेत. बारामतीमध्ये १ हजार ७८० सक्रिय रुग्ण असून बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह दर १८.९८ टक्के इतका झाला आहे, तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ८२.११ टक्क्यांवर पोहोचले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये तालुकापातळीवर बारामतीमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला आहे. बारामतीची एकूण रुग्णसंख्या १० हजार ९२९ झाली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ९७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत १७५ बळी कोरोनामुळे गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची व्यापकता मोठी असल्याने प्रशासनाने मंगळवार (दि. ६) पासून बारामती शहर व तालुक्यामध्ये कडक निर्बंधासह ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता टाळेबंदी जाहीर केली होती. मागील महिनाभरापासून सातत्याने बारामतीतील रूग्णसंख्या वाढत आहे. परिणामी डेडीकेटेड केअर हेल्थ सेंटर रूई, उपजिल्हा रूग्णालय (डीसीएचसी), डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (खासगी) आदी ठिकाणी येत्या काही दिवसांत खाटांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीमध्ये प्रशासनाने गृह अलगीकरणास सुरुवात केली आहे.
वेळप्रसंगी औषधतज्ज्ञ डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात येणार आहे. ही सेवा ऑनकॉल पद्धतीची असणार आहे. तसेच बारामतीमध्ये डॅश बोर्ड तयार करण्यात येणार असून त्याद्वारे दैनंदिन रूग्णस्थिती व उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी बारामतीमध्ये ७५९ डॉक्टर, ६०४ नर्स आणि १ हजार ७६० इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार ठेवण्यात आला आहे. शहरात नव्याने शासकीय नर्सिंग होममध्ये ७६, वैद्यकीय महाविद्यालयाचे रूग्णालय येथे १५०, प्रगतीनगर येथे ३० असे २५५ ऑक्सिजन खाटा उभारणीचे काम सुरू आहे.
बारामतीतील कोरोना रूग्णस्थिती
- उपचार सुरू असलेले : १,७८०
- लक्षणेरहित : ७८२
- सौम्य लक्षणे : १६९
- मध्यम लक्षणे : ४१३
- गंभीर : १५
- अति गंभीर : ७५
- गृह अलगीकरण : २९०
-----------------------
येथे घेत आहेत उपचार...
- कोविड केअर सेंटर : ६०२
- रूई ग्रामीण रूग्णालय : ३२
- उपजिल्हा रूग्णालय बारामती : १३१
- डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल खासगी : ५७
-----------------------------------
बारामतीमधील कोरोना रूग्णांसाठी
उपलब्ध खाटांची संख्या
कोविड केअर सेंटर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह: २२४
- टीसी कॉलेज मुलींचे वसतिगृह : ४६२
- शिवनगर विद्याप्रसारक मंडळ मुले, मुली वसतिगृह : ३००
- तारांगण मुलींचे शासकीय वसतिगृह : ७५
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह : १००
एकूण : १,१६१
-----------------------
डेडीकेटेड केअर हेल्थ सेंटर
- उपजिल्हा रूग्णालय बारामती : १००
- ग्रामीण रूग्णालय, रूई : ३०
- इतर खासगी हॉस्पिटल (८० टक्के बेड) प्रमाणे : ५१४
एकूण : ६४४
------------------------
डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल
- बारामती हॉस्पिटल : ४०
------------------------------
बारामती शहर आणि तालुक्यातील एकही कोरोनाचा रूग्ण खाट उपलब्धतेअभावी उपचारापासून वंचित राहणार नाही. अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये.
- दादासाहेब कांबळे
उपविभागीय अधिकारी, बारामती
---------------------------
बारामतीत ऑक्सिजन खाटांची कमतरता भासणार नाही. सध्या २५५ ऑक्सिजन खाटा उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. कोरोनासंदर्भातील औषधांची कमतरता नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. मास्कचा वापर करावा.
- डॉ. सदानंद काळे
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय बारामती