घरकुल पुरवणी : लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:04+5:302021-04-17T04:10:04+5:30
...................................... ॲड. गौतम कर्णिक पुणे : सदनिका खरेदी करताना ग्राहकाने वकिलांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे घर खरेदी विक्रीनंतर ...
......................................
ॲड. गौतम कर्णिक
पुणे : सदनिका खरेदी करताना ग्राहकाने वकिलांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे घर खरेदी विक्रीनंतर कोणत्याही तंट्याला वाव राहत नाही, असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ अॅड. कर्णिक यांनी व्यक्त केले. सदनिकांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावयास हवी याबाबतची माहिती देताना ते ''लोकमत''बरोबर बोलत होते.
नवीन घर घेताना घ्यावयाच्या काळजीबाबत ते म्हणाले की नवीन सदनिका घेताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित विकासकाचा आजपर्यंतचा या क्षेत्रातील व्यवहार (गुडविल) कसे आहे हे विचारात घेणे आवश्यक आहे. त्याने आतापर्यंत किती संकुले उभी केली आहेत. त्याचबरोबर याआधी संबंधित विकसकाने केलेल्या कामाबद्दल आधीच्या ग्राहकांची मतं काय आहेत, हेही जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आजच्या मार्केटमध्ये त्याचे काय महत्त्व आहे, हेसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर नवीन घर घेताना काही विकासकाबरोबर व्यवहार करताना तुम्हाला वेगवेगळी आश्वासने देतात आणि नंतर मात्र प्रत्यक्षात विपरीत घडते. त्यामुळे आधी संबंधित भूखंड, परिसर व बांधकाम योजनांविषयी खातरजमा करुन घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
जेव्हा ग्राहक आणि विकसकामध्ये सदनिकेचा व्यवहार होतो, त्या वेळी ज्या सुविधा आणि सदनिका त्याला मंजूर करण्यात आल्या आहेत, त्या सदनिकेची कागदोपत्री माहिती आणि सुविधांची कागदोपत्री खातरजमा व्यवस्थित आहेत का, याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. तशी पडताळणी केल्यास ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता फार कमी होते.
कागदपत्रांची तुमच्या पातळीवर तपासणी झाल्यानंतर त्यावर समाधान न मानता तुमच्या ओळखीच्या नामांकित वकिलांचा कायदेशीर सल्ला घ्यायला हवा. जेणेकरून वकील कायदेशीर बाबी सखोल तपासून घेतात. सदनिकेत ग्राहकाला काय मिळणार आहे, सोसायटीत. कुठल्या बाजूला घर असणार आहे याविषयी सर्व माहिती उघडपणे वकिलांना सांगायला हवी. त्यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे खरोखर लॉन, जलतरण तलाव अशा सुविधा योग्य त्या दिशेला आहेत की नाही ते समजेल, अन्यथा नको त्या बाबी घरासमोर येऊन मनस्ताप होईल.
काही प्रकरणात ग्राहकांनी आपल्या वकिलांना कागदपत्रे, ताजा मंजूर बांधकाम नकाशा आणि तोंडी चर्चेची नीट माहिती न दिल्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्याने वाद झाले असल्याचीही काही प्रकरणे आहेत.
जर ग्राहक घेत असलेल्या सदनिकेचे काम निर्माणाधीन असेल तर सुरुवातीला विकासकाकडून मिळालेल्या माहितीपत्रकात (ब्राऊशरमध्ये) दाखवलेली इमारत आणि इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरची वास्तू, अन्य सोयीसुविधा यांची माहिती योग्य आहे की नाही याचीही पडताळणी करायला हवी. त्याचबरोबर बांधकामाची माहिती जशी मिळाली होती त्याच पद्धतीने काम झाले आहे का, हेही तपासणे फार महत्त्वाचे आहे.
चॅनल पार्टनर ज्यांना बोलीभाषेत एजंट म्हणतात ते तुम्हाला विकसकामार्फत वेळोवेळी माहिती देत असतात. त्यांची रेराकडे नोंदणी झालेली आहे का, याचीही खबरदारी घ्यावी,
एखाद्या सदनिकेचा व्यवहार हा काही वेळा एकापेक्षा अधिक लोकांबरोबर होऊ शकतो, त्यातूनही तंटा निर्माण होऊ शकतो, असेही ॲड. कर्णिक म्हणाले.