बिबवेवाडी येथे मध्यरात्री गुंडावर वार करुन निघृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:54+5:302021-05-16T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात एका बाजूला लॉकडाऊन सुरु असताना बिबवेवाडी येथे दोन गटातील अनेक जण एकत्र येतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात एका बाजूला लॉकडाऊन सुरु असताना बिबवेवाडी येथे दोन गटातील अनेक जण एकत्र येतात. त्यातून मध्यरात्रीच्या सुमारास १० जण मिळून एका गुंडावर सपासप वार करुन त्याचा निघृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना मध्यरात्री दीड वाजता बिबवेवाडी पोलीस चौकीसमोरील डॉ. आनंद पंडीधर यांच्या सरोजनी क्लिनिकसमोर घडली.
माधव हनुमंत वाघाटे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ संजय पलंगे (वय २१, रा. बालाजीनगर, धनकवडी) याने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावन गवळी, आबा ढावरे, सुनिल घाटे, पवन गवळी व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माधव वाघाटे हा सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. माधव वाघाटे, सुनिल खाटपे व सावन गवळी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सुनिल खाटपे व सारंग गवळी यांच्यामध्ये भांडणे झाली होती. सारंग गवळी याने कामठे नावाच्या तरुणाचे व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते. सुनिल खाटपे व कामठे यांच्यामध्ये वितुष्ट असल्याने खाटपे याने गवळी याला हे स्टेटस काढण्यास सांगितले होते. यातूनच त्यांच्यामध्ये वादावादी होऊन झटापट झाली. सुनिल खाटपे याने फोन करुन माधव याला या भांडणाची माहिती दिली. मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याचे सांगितले. त्यानुसार माधव व फिर्यादी सिद्धार्थ पलंगे हे दोघे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी चौकीच्या समोर सुनील याची वाट पहात थांबले होते. यावेळी तेथे सावन गवळी व इतर १० जण आले. त्यांनी लाकडी बांबु, दगड, लोखंडी रॉडसारख्या हत्याराने व ट्युबलाईटने माधव वाघाटे याच्या तोंडावर व डोक्यावर वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर हे टोळके पळून गेले.
या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.