प्रामाणिक शिक्षकच दुर्लक्षित : ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:49 AM2017-08-28T01:49:06+5:302017-08-28T01:49:15+5:30
दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो.
बी़ एम़ काळे
जेजुरी : दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५ सप्टेंबर रोजी जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शासनाच्या वतीने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिले जातात. प्रत्येक तालुक्यात एक मुख्य पुरस्कार आणि दुसरा प्रोत्साहनपर पुरस्कार असे दोनच पुरस्कार दिले जातात. सध्या प्रत्येक तालुक्यातून या पुरस्कारासाठी शिक्षकांची व शाळा तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून मात्र या पुरस्काराबाबत व पुरस्कारासाठी शिफारशी झालेल्या नावांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. पुरस्कार शिक्षकांच्या गुणवत्तेचा, की केंद्रप्रमुखांच्या प्रतिष्ठेचा? प्रामाणिकपणे गुणवत्तेचे कार्य करणारे शिक्षकच दुर्लक्षित राहात असल्याने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ नको रे बाबा! अशाच प्रतिक्रिया येत आहेत.
‘आदर्श शिक्षकांची अर्थपूर्ण वर्णी’ अशा प्रकारे आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आक्षेप घेत ही निवड व तपासणी अतिशय काटेकोरपणे व पारदर्शक व्हावी अशी अपेक्षा ‘लोकमत’ने (दि.२२) व्यक्त केली होती. मात्र तशा प्रकारे कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची नावे पाठवताना गटशिक्षणाधिकारी यांच्या मर्जीतील व अतिशय घनिष्ठ संबंध असणाºया केंद्रप्रमुखांनी सुचवलेली नावेच अंतिम झाली असल्याने शिक्षणक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुरंदरमधून पुणे जिल्हा परिषदेकडे पाच शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक तर पंचायत समितीत कार्यालयातील कामे, दहावी बारावीची आॅक्टोबर तसेच मार्च एप्रिलच्या परीक्षेचे नियोजन उत्कृष्ठरीत्या पार पाडण्याचे तंत्र अवगत असलेला शिक्षक म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. शाळेवर कमी पण कार्यालयीन कामाला जास्त वेळ असणाºया शिक्षकांच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे.
वरिष्ठांशी घनिष्ठ संबंध असणारे एक पर्यटन व्यावसायिक केंद्रप्रमुख तर वर्षातून अनेक वेळा भारतभ्रमण पर्यटनावरच असतात. मात्र ते अनेक वर्षांपासून आपल्याच केंद्रातील शिक्षकाची शिफारस करण्यास वरिष्ठांना भाग पाडतात व पुरस्कारही मिळवून घेतात. या शिवाय दोन शिक्षकांची नावे गेल्या वर्षीही सुचवण्यात आली होती. पुरस्कारास पात्र न ठरल्याने या वर्षीही पुन्हा नावे पाठवण्यात आली आहेत. या वर्षी पाठवण्यात आलेल्या यादीतील एकाच शिक्षकाचे नाव योग्य असल्याचे शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे.
यावषी गुणवत्तेत व लोकसहभागातून शाळा आदर्श करणाºया व जिल्हा परिषद सदस्यांचे गावातीलच एका महिला शिक्षिकेचे नाव शिफारसीसाठी जाणीवपूर्वक डावलल्याने सदर शिक्षिकाही न्याय मागत आहे.
तालुका प्रशासनाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप या शिक्षिकेने ‘लोकमत’कडे केला आहे. पुरस्कारासाठी शिफारशी केलेल्या शिक्षकांच्या शाळांची तपासण्या सुरू झाल्या आहेत. यात मुळशी व मावळ या ठिकाणाहून अधिकारी येऊन एका दिवसामध्ये रामवाडी, चिल्हावळी व पानवडी या तीनही शाळांतील शिक्षकांची व गुणवत्तेची पाहणी घाई गडबडीत करतातच कशी? अशी चर्चा आहे. या शिक्षिकेला न्याय मिळावा यासाठी तालुका गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी गेल्या वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी वेगळे होते, या वेळी दुसरे आहेत, त्यामुळे आपण या महिला शिक्षिकेच्या नावाबद्दल वरिष्ठांकडे शिफारस करतो. त्यांनी दखल घेतली तर तपासणी होईल असे सांगितले. या शिक्षिकेला न्याय मिळणार का? अशीच चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.