रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! प्रवाशाचे विसरलेले तीन तोळे सोने केले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 06:46 PM2023-04-15T18:46:32+5:302023-04-15T18:49:57+5:30
रिक्षा चालकाने प्रवाशाची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवत परत केली...
नसरापूर (पुणे) : रिक्षात प्रवाशाची विसरलेली तीन तोळे ऐवजाची बॅग अवघ्या चोवीस तासाच्या आत नसरापूर (ता.भोर) राजगड पोलिसांना प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा सहाय्यक पोलीस निरिक्षकांनी सत्कार केला. सुनील रघुनाथ बाठे (रा. दिवळे- कपूरव्होळ) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षा चालकाने प्रवाशाची रिक्षात अनावधानाने राहून गेलली पर्स सांभाळून ठेवत परत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरापूर येथील महीला प्रमिला सचिन शेटे या त्यांच्या दिवे ( सासवड) येथे माहेरच्या यात्रेसाठी मुलीसोबत गुरुवारी ( दि. १३ ) रोजी त्या एम. एच. १२ आर. टी. ७४८५ मध्ये बसून कापूरहोळ येथे उतरल्या. त्यानंतर दुसऱ्या वाहनाने सासवडपर्यंत गेल्या होत्या. त्यावेळी रिक्षाने कापूरहोळ चौकात रिक्षामध्ये बॅग विसरून गेल्या असल्याचे प्रमिला शेटे यांच्या लक्षात आले. या झालेल्या प्रकाराची माहिती पतीला सांगितली. त्यावेळी सचिन शेटे व पत्नी प्रमिला यांनी रिक्षाचालकाचा परिसरात शोध घेतला मात्र रिक्षा सापडली नाही . त्यानंतर हतबल दांपत्याने राजगड पोलीस ठाण्यात जाऊन सोन्यासह बॅग हरविल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय ढावरे, ठाणे अंमलदार मयूर निंबाळकर, गणेश कुदळे, सचिन नरुटे यांनी प्रमिला शेटे यांनी वर्णनानुसार रिक्षाचालक व रिक्षाचा शोध घेतला. त्यावेळी रिक्षाचालकाला ओळखू शकते असे पोलिसांना सांगितले होते. कापूरव्होळ येथील रिक्षा स्टॉपवर तपासकामी पाठविले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. दरम्यान रिक्षाचालक सुनील बाठे नेहमीप्रमाणे रिक्षा व्यवसाय करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी व्यवसायासाठी रिक्षा बाहेर काढली असता त्यांना एक बॅग आढळून आली.
रिक्षामध्ये नसरापूरमधील महिला तीन तोळे सोने असलेली व कपड्यांनी भरलेली बॅग प्रवासादरम्यान विसरल्याची लक्षात आल्यानंतर तातडीने नसरापूर येथील राजगड पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित महिलेला बॅग पुन्हा परत केली. त्यावेळी महिलेचे पती यांनी सचिन शेटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर बक्षिसी देऊन प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार केला. त्यावेळी प्रामाणिक रिक्षाचालकाचे पोलिसांनी कौतुक केले.