लेणी अभ्यासासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थावर मधमाशांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 08:57 PM2018-11-10T20:57:46+5:302018-11-10T20:59:03+5:30
जुन्नर जवळील अंबाआंबिका , मानमोडी, भूतलेणी येथे लेणी अभ्यासासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकावर लेण्यातील मधमाशांनी हल्ला केला.
जुन्नर : जुन्नर जवळील अंबाआंबिका , मानमोडी, भूतलेणी येथे लेणी अभ्यासासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकावर लेण्यातील मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याने घेतलेल्या चाव्यानी अस्वस्थ झालेल्या या पर्यटकांवर जुन्नरमधील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. लेण्या पहाण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला करण्याचा हा मागील दोन वर्षातील चौथा प्रकार असुन या निम्मिताने लेणी संवर्धनाबाबत , देखभालीबाबत पुरातत्व विभागाकडुन होत असलेल्या अनास्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अमेरिकातील कोलंबिया विद्यापीठातील इतिहास विभागाचा विद्यार्थी जेरेमी सिमन्स पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या माध्यमातुन प्राचीन भारत या विषयाचा अभ्यास करण्यासाठी जुन्नर परिसरातील लेण्या पहाण्यासाठी आले होते. यावेळी मानमोडी डोंगरावरील भिमाशंकर गटातील लेण्या पहाण्यासठी जेरेमी सिमन्स जुन्नर येथील सहकारी मार्गदर्शक प्रणित बुट्टे, चालक सुरज कांबळे गेले होते. येथील लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मध माशांची पोळी आहेत. हे अभ्यासक लेणी पहात असताना अचानक मध माशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांनी चेहरा,शरिराचा उघडा भाग यावर चावण्यास सुरवात केल्याने अक्षरशा त्यांना लेण्यापासून 1 किमी लांब अंतरापर्यंत पळत यावे लागले. मधमाशांनी घेतलेल्या चाव्याने त्यांचे काटे चेहऱ्यावर रुतून बसले होते.
मधमाशांच्या चाव्याने वेदना होत असताना देखील चालक कांबळे यांनी पर्यटंकाना जुन्नरमधील डॉ विशाल आमले यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आणले. तर जेरेमी सिमन्स यांना जास्त त्रास होत असल्याने डॉ सुनील शेवाळे यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले.उपचाराननंतर त्यांना सोडण्यात आले.