पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:14 AM2017-08-03T03:14:36+5:302017-08-03T03:14:36+5:30

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीने पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीच्या आयोजनाला लक्षवेधी आयोजनाचा पुरस्कार लाभला आहे.

Honor of Davis Cup in Pune | पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीचा सन्मान

पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीचा सन्मान

googlenewsNext

पुणे : आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीने पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीच्या आयोजनाला लक्षवेधी आयोजनाचा पुरस्कार लाभला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड (आर अँड आर) समितीने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आशिया-ओशियाना गट १ मधील भारत वि. न्यूझीलंड या लढतीचे आयोजन करण्यात आले होते. लढत यशस्वी करण्यासाठी राज्य टेनिस संघटना आणि आयोजक असणाºया पुण्याच्या संघटकांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे हा सन्मान मिळाला असल्याचे ‘आर अँड आर’ समितीने भारतीय टेनिस महासंघाला कळवले आहे. या सन्मानासाठी लढतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने येणाºया सर्व बाबींचा विचार करण्यात येतो. पुण्याच्या सहकार्याने राज्य टेनिस संघटनेने ही लढत यशस्वी करण्यासाठी अनेक वेगळे उपक्रम राबवले होते. यामध्ये त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंसाठी विशेष क्लिनिकचे आयोजन केले होते. प्रेक्षकांसाठी खास बक्षिसे ठेवली होती. त्यांच्यासाठी अल्पोपाहारही ठेवण्यात आला होता. विशेषकरून लढतीच्या ‘ड्रॉ’च्या दिवशी खेळाडूंना केंद्रावर आणण्यासाठी साकारलेली मिरवणुकीची कल्पना तर या सगळ्याचा सर्वोच्च बिंदू ठरली. आतापर्यंत खेळाडूंचे अशा पद्धतीने कधीच स्वागत करण्यात आले नव्हते. टेनिस खेळाला लोकप्रिय करण्यासाठी केलेले हे सगळे प्रयत्न सन्मानासाठी पात्र ठरतात. म्हणूनच या लढतीची आम्ही लक्षवेधी लढत म्हणून निवड केल्याचे ‘आर अँड आर’ या समितीने नमूद केले आहे.
राज्य टेनिस संघटनेचे अध्यक्ष भरत ओझा आणि सचिव सुंदर अय्यर यांनी या सन्मानाने आमचा आत्मविश्वास उंचावल्याचे मत व्यक्त केले. सुंदर अय्यर म्हणाले, ‘‘भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यापेक्षा अधिक आकर्षकपणे आयोजन करण्यासाठी आम्हाला या सन्मानाने प्रेरणा मिळाली आहे. राज्यातील टेनिसच्या प्रसारासही याचा फायदा होईल. महाराष्ट्र सरकार, राष्ट्रीय टेनिस संघटना, राज्य टेनिस संघटना, आश्रयदात्या अमृता फडणवीस, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन करीर, संयोजन सचिव प्रशांत सुतार, क्रीडा संचालनालयाचे पदाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या प्रत्येकाकडून आम्हाला भक्कम पाठिंबा मिळाला. त्यामुळेच डेव्हिस करंडक लढतीचे पुण्यात ४३ वर्षांनी यशस्वी आयोजन करू शकलो.’’

Web Title: Honor of Davis Cup in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.