तिच्या कर्तृत्वाला पोलीस महासंचालकांचा सन्मान
By admin | Published: April 11, 2015 10:54 PM2015-04-11T22:54:20+5:302015-04-11T22:54:20+5:30
लहानपणापासून उराशी बाळगलेलं नेमबाजीचं स्वप्न पोलीस दलामध्ये भरती झाल्यावरही तिने त्याच जिद्दीने जपलं. पोलीस दलातील धावपळीची नोकरी आणि संसार सांभाळून तिने स्वत:ला ‘चॅम्पियन’ बनवलं.
पुणे : लहानपणापासून उराशी बाळगलेलं नेमबाजीचं स्वप्न पोलीस दलामध्ये भरती झाल्यावरही तिने त्याच जिद्दीने जपलं. पोलीस दलातील धावपळीची नोकरी आणि संसार सांभाळून तिने स्वत:ला ‘चॅम्पियन’ बनवलं. सुरुवातीला आई-वडील आणि नंतर पतीच्या पाठिंब्यावर विविध स्पर्धांमध्ये स्वत:ची छाप उमटवणाऱ्या पोलीस नाईक परवीन मेहबूब पठाण यांच्या खेळातील कर्तृत्वाची दखल पोलीस खात्यानेही घेतली. खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
परवीन पठाण सध्या पिंपरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. पठाण या मूळच्या बारामतीजवळील नीरावागज या गावच्या. वडील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात नोकरीला, तर आई गृहिणी. त्यांना चार मुली आणि एक मुलगा. आई-वडिलांनी सर्व अपत्यांना शिकवले. परवीन यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. त्यांची आणखी एक बहीण पोलीस दलातच असून सध्या मुंबईमध्ये नेमणुकीस आहे. तर चौथी बहीण आणि भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या परवीन २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाल्या.
त्यांना लहानपणापासूनच नेमबाजीची आवड होती. त्याचे प्रशिक्षणही
त्यांनी घेतले होते. एनसीसीमध्ये असताना तर ही आवड आणखीच वाढली. दरम्यान, २०११ मध्ये त्यांचे आसिफ इकबाल शेख यांच्यासोबत लग्न जमले.
२०११ मध्ये हरियानातील कादरपूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना जायचे होते. साखरपुडा नुकताच उरकलेला असताना त्या स्पर्धेमध्ये
सहभागी होण्यासाठी गेल्या. तेथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी कास्यपदक पटकावले होते. त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून
स्वत:चा ठसा उमटवला. पती आसिफ शेख यांनीही त्यांची खेळातील रुची पाहून कायमच पाठींबा दिला. दरम्यान, त्यांना मुलगी झाली. तिचे नाव झोया. संसाराची जबाबदारी सांभाळून परवीन २०१४ मध्येही पुन्हा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या. या स्पर्धा स्त्री-पुरुष एकत्रित होत्या. त्यातही त्यांनी जिद्दीने भाग घेत देशात चौथे आणि राज्यात पहिले स्थान पटकावले.
४भोपाळ, इंदोर, हरियाना, जालंधर, बालेवाडी आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये पुणे शहर पोलीस दलाला परवीन यांनी आतापर्यंत तब्बल अकरा पदके प्राप्त करुन दिली आहेत. यामध्ये चार सुवर्ण, चार रौप्य, तीन कास्य पदकांचा समावेश आहे. पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. या यशाचे श्रेय आई-वडिलांना देत असल्याचे परवीन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महासंचालकपदकामुळे पोलीस दलाने सन्मान केल्याची भावना असून यापुढे खेळामध्ये अधिक जोमाने पुढे जाण्यासाठी त्यामुळे प्रेरणा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.