कोरोना काळामध्ये तमाशा कलावंतांना मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:33+5:302021-04-14T04:09:33+5:30
केडगाव : कोरोना काळामध्ये तमाशा कलावंताला प्रति महिना पाच हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल ...
केडगाव : कोरोना काळामध्ये तमाशा कलावंताला प्रति महिना पाच हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सद्य:स्थितीत कोविड-१९ ने पुन्हा थैमान घातले असून, सर्व ठिकाणच्या यात्रा-जत्रा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याची लोककला असलेल्या तमाशा फड मालकांवर देखील या महामारीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यात सुमारे १४० हून अधिक नोंदणीकृत तमाशा फड असून त्यापैकी १२ मोठे फड हे सुमारे २०० हून अधिक कलाकार आहेत, तर ११८ फड हे प्रत्येकी ५० ते ६० कलाकार असलेले आहेत.
राज्यभरात एकूण ६००० हून अधिक तमाशा कलावंत असून कोरोना महामारीने या महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत यात्रा-जत्रा सुरू होत नाहीत तोपर्यंत या प्रत्येक कलाकाराला सुमारे ५ हजार रुपये मानधन मदत म्हणून देण्यात यावे व हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या फडमालकांना २५ लाख व छोट्या फडमालकांना १० लाख रुपये अनुदान पुन्हा नव्याने फड सुरु करण्यासाठी द्यावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार , सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.