माननीय म्हणतात, मोठ्या पाळण्यांना परवानगी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:42 PM2019-11-19T12:42:38+5:302019-11-19T12:47:00+5:30
सारसबागजवळील चौपाटीच्या धोक्यात वाढ
पुणे : सारसबागेजवळील चौपाटीवर उभ्या करण्यात येणाऱ्या पाळण्यांना परवानगी नसतानाही येथे मोठ्या पाळण्यांना परवानगी देण्याची मागणी एका ‘माननीयां’नी केली आहे. एकीकडे येथील अतिक्रमणात भर पडत चाललेली असतानाच धोकादायक खेळण्यांचीही संख्या वाढली आहे. यासोबतच घोडे, हातगाड्यांमुळे रस्त्याला चिंचोळ्या बोळाचे रूप आले आहे. या ठिकाणी लावण्यात येत असलेल्या पाळण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे पाळणे बेकायदा आणि धोकादायक असून, अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि पोलीस निरीक्षकांची असेल, असे पत्र अतिक्रमण विभागाने दिले आहे. तरीही एका ‘माननीयां’नी मात्र मोठ्या पाळण्यांना परवानगी मिळावी, असे पत्र दिले आहे.
सारसबाग चौपाटीवर एकूण ५२ स्टॉल्स आहेत. या स्टॉलधारकांकडून नेहमीच नियम धाब्यावर बसवून अतिक्रमण केले जाते. स्टॉलसमोरील जागेमध्ये छप्पर उभारुन त्याखाली टेबल-खुर्च्या ठेवल्या जातात. त्याच्या पुढे वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे या रस्त्यावरुन चालणाºयांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्टॉलधारकांच्या कामगारांकडून होणाऱ्या अरेरावीलाही नागरिक कंटाळले आहेत. गेल्याच आठवड्यात पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी कारवाई करीत छप्पर तोडले. परंतु, कारवाईनंतर एक-दोन दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
या ठिकाणी एक मोठा अडथळा पाळण्यांचा आहे. या ठिकाणी सहा बाय सहा या आकारात फिरणाऱ्या लहान मुलांच्या पाळण्यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु, या ठिकाणी मोठ-मोठे पाळणे लावण्यात आलेले आहेत. हे पाळणे लावायचे असल्यास विविध स्वरुपाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. त्याची तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु, कोणत्याही तपासणी आणि परवानगीशिवाय हे पाळणे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या या व्यावसायिकांना पालिकेच्या कारवाईचा धाक उरलेला नाही. या पाळण्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
एखादा पाळणा तुटल्यास नागरिकांसह लहान मुलांच्या जीवावर बेतू शकते. अतिक्रमण विभागाने यासंदर्भात कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना पत्र दिले आहे. हे बेकायदा आणि धोकादायक पाळणे काढून टाकावेत तसेच त्यामधून काही अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय आणि पोलिसांची असेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याची एक प्रत स्वारगेट पोलिसांनाही देण्यात आलेली आहे.
.......
प्रशासनाकडून धोरण तयार करण्याचे काम
या ठिकाणी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. अपुऱ्या जागेमुळे रस्ता या खेळण्यांसह बेकायदा हातगाड्या, घोडेवाले यांनी व्यापून टाकला आहे. पाळण्यांविषयी निर्णय घेण्याकरिता प्रशासनाने धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी पालिकेचे याविषयी काही धोरण होते का, याची माहिती काढण्याचे काम अतिक्रमण विभागाने सुरू केले आहे.
........
2 - धोरण ठरवून प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वीची न्यायालयीन दाव्यातील एक यादी पालिकेला मिळाली असून, यामध्ये वीस पाळणा व्यावसायिकांची नावे पालिकेला मिळाली आहेत.
.....
3- त्यामध्ये बहुतांश पाळणे सहा बाय सहा, सहा बाय पाच, पाच बाय पाच या व्यासात फिरणारे आहेत. तर तीन पाळणे दहा बाय पंधरा या व्यासात फिरणारे आहेत. त्यातच आता एका नगरसेवकानेच मोठे पाळणे लावण्याची परवानगी मागितल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायचे की माननीयांचे ऐकायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
......