महिला दिनाआधीच अंगणवाडी सेविकांना मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:51+5:302021-03-04T04:20:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन महिला दिनाच्या आधी देण्याचे आश्वासन एकात्मिक बाल विकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन महिला दिनाच्या आधी देण्याचे आश्वासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
मुंबईत इंद्रा मालो यांची शिष्टमंडळाने बुधवारी (दि.३) भेट घेतली. थकीत मानधन, निवृत्ती वेतन तसेच अन्य प्रश्नांसाठी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालो यांची भेट घेतली असता हे आश्वासन देण्यात आले.
अंगणवाडी कृती समितीच्या वतीने नितीन पवार, एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, अरमायटी इराणी, धोंडिबा कुंभार तसेच कृती समिती संलग्न संघटनांचे राजेश सिंह, विठा पवार, संगीता कांबळे यांनी मालो यांची भेट घेतली. आश्वासनानंतर नियोजित आंदोलन स्थगित केल्याचे पवार यांनी सांगितले.
महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार करावा व सरकारला सादर करावा, अशी मागणी कृती समितीने केली. त्यास आयुक्त मालो यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.