ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात चार दिवसांत मानधन जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:13+5:302021-04-06T04:10:13+5:30
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ग्वाही : प्रश्न काहीप्रमाणात का होर्ईना सुटणार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांच्या ...
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ग्वाही : प्रश्न काहीप्रमाणात का होर्ईना सुटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांच्या तीन महिने थकलेल्या मानधनाचा प्रश्न काहीप्रमाणात का होर्ईना सुटणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ज्येष्ठ कलाकारांच्या थकीत मानधनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमधील ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात सोमवारी (दि.६) मानधन जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या तीन-चार दिवसांत उर्वरित जिल्ह्यांमधील ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मानधन जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चावरे यांनी दिली. मात्र, मार्च आणि चालू एप्रिल महिन्याचे मानधन मिळण्यासाठी पुन्हा ज्येष्ठ कलाकारांना प्रतीक्षाच करावी लागण्याची शक्यता आहे.
ज्या रंगकर्मींनी आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली, त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या हक्काच्या मानधनासाठी सातत्याने भीक मागावी लागत आहे. दर महिन्याला त्यांच्या खात्यात मानधन जमा होणे अपेक्षित असतानाही त्यांच्या खात्यात तीन ते चार महिन्यांतून एकदा मानधनाची रक्कम जमा केली जात आहे. यातच यंदाच्या वर्षातील जानेवारी ते मार्चमधील मानधन त्यांना मिळालेले नाही. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी मार्च अखेर त्यांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा होईल असे दिलेले आश्वासन देखील हवेतच विरले. यासंबंधीचे वृत्त ‘दै. लोकमत’ने सोमवारी (दि.६) प्रसिद्ध करून ज्येष्ठांच्या थकीत मानधनाच्या प्रश्नाला वाचा फोडली. अखेर त्या वृत्ताची दखल घेऊन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने थकीत मानधन जमा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या.
मानधन वाटपाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू
विभीषण चावरे म्हणाले की, ज्येष्ठ कलाकारांच्या मानधन वाटपाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काही ज्येष्ठ कलावंतांच्या खात्यात पैसेही जमा झालेले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत सर्वच ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचे मानधन जमा होईल. मार्च महिन्यातील मानधनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाली तर तेही तत्काळ कलाकारांच्या खात्यात जमा होईल. ज्येष्ठ कलाकारांचे हित जाणून आहोत. पण, सध्या संपूर्ण यंत्रणा कामात व्यस्त असल्याने दिरंगाई होत आहे. परंतु, तीन ते चार दिवसांत नक्कीच ज्येष्ठ कलाकारांचे मानधन मिळेल.
--
ज्येष्ठ कलाकारांचे मानधन जमा होण्यास मार्च महिना अखेरीमुळे काहीसा विलंब लागला. सर्व बिले मंजूर झाली आहेत. येत्या आठ दिवसांत ते जमा होईल असे सांगण्यात आले आहे.
- सुचेत्रा देशपांडे, ओएसडी, मराठी भाषा विभाग
(आज मुख्य मुख्य अंक पान २ वर छापलेली बातमी कटींग यात वापरावे)