इराणी टोळीतील एकाला पाठलाग करून पकडणाऱ्या धाडसी पोलिसांचा वारज्यात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:33 PM2018-01-13T13:33:43+5:302018-01-13T13:38:44+5:30
मंगळसूत्र चोरट्या इराणी टोळीतीळ एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडणारे वारजे पोलीस ठाण्यातील कर्मचारी नीलेश कोल्हे व रवींद्र पवार यांचा नुकताच आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वारजे : मंगळसूत्र चोरट्या इराणी टोळीतीळ एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडणारे वारजे पोलीस ठाण्यातील कर्मचारी नीलेश कोल्हे व रवींद्र पवार यांचा नुकताच आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वारजे येथील पॉप्युलर कॉलनीत राहणारी ४६ वर्षीय महिला येथील बाह्यवळण महामार्गावरील अतुलनगर जवळ प्रभात फेरी मारत असताना दुचाकीवरून पाठीमागून येणाऱ्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागरिकांनी लगेच नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर दोघे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजार झाले. नागरिकांकडून त्यानी चोरटे व त्यांच्या वाहनाचे वर्णन घेतले व चोरटे गेलेल्या चांदणी चौकाच्या दिशेला धाव घेतली. तोपर्यंत डुक्कर खिंडीत चोरट्यांनी अजून एका महिलेला अशाच प्रकारे लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
चांदणी चौकात मुंबईकडे जाणाऱ्या बसथांब्याजवळ अशाच प्रकारच्या सावज महिलेच्या शोधात असताना पोलीस मार्शल कोल्हे व पवार यांनी त्यांना गाठले व थंडीच्या दिवसांत पहाटे पोलिसांनीही जॅकेट व मफलर गुंडाळले असल्याने चोरट्यांना ते पोलीस असल्याची लगेच कल्पना आली नाही. मात्र, विचारणा करीत असतानाच कोल्हे यांचा पोलीस वॉकीटॉकी वाजल्याने त्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना मारहाण करून पाळण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पवार यांच्या हाताला मोठा मुकामार लागून एक जण फरार झाला. दुसरा चोरटा हसन फिरोज सय्यद ऊर्फ इराणी (रा. शिवाजीनगर) याला पकडण्यात पोलीस यशस्वी झाले व त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.