कोरोनाकाळात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:08+5:302021-07-07T04:13:08+5:30
पुणे : मागील दोन वर्षांच्या कोरोनाकाळात बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या सर्व डाॅक्टरांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार बालेवाडी येथे नुकताच ...
पुणे : मागील दोन वर्षांच्या कोरोनाकाळात बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या सर्व डाॅक्टरांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार बालेवाडी येथे नुकताच करण्यात आला. कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये अनेकांना उपचार मिळणं कठीण झालं होतं. पण बाणेर परिसरातील सर्वच डॉक्टरांची अतिशय चांगले काम केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
या वेळी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, बाणेर बालेवाडी मेडिको असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, नितीन कळमकर, सागर बालवडकर, विशाल विधाते, समीर चांदेरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन चांदेरे यांनी केले होते.
याप्रसंगी डॉ. अभय खोडे, डॉ. माधव चव्हाण, डॉ. सुषमा जाधव, डॉ. कविता चौधरी, डॉ. ईश्वर झंवर, डॉ. स्नेहल बडजाते आदी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बाविस्कर म्हणाले,‘‘कठीण काळामध्ये आपण दोनच व्यक्तींचा धावा करतो. एक म्हणजे देव आणि दुसरे डॉक्टर. कारण डॉक्टर हे रुग्णांचे प्राण वाचवतात. त्यामुळे त्या डॉक्टरांना ‘लोकमत’चा सलाम.’’
डाॅ. देशपांडे म्हणाले, या महामारीत असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही हेल्पलाईन तयार केली होती. त्या माध्यमातून कडक लाॅकडाऊनच्या काळात प्रत्येक सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांना तसेच लहान मुलांसाठी योग्य वेळी काम केले. त्यामुळे रुग्णांचे निदान होऊन त्यांना वेळेवर उपचार मिळाले. तसेच इतर भागांच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण बाणेर परिसरात कमी निघाले. संघटनेच्यावतीने डॉक्टरांना मोफत पीपीई किट दिले होते. पोलिसांना एन ९५ मास्कचे वाटप केले. तसेच व्हेंटिलेटर मशीनही उपलब्ध करून दिले होते.
चांदेरे म्हणाले की, ‘‘आमच्या प्रभागात या सर्व डाॅक्टरांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळे कोरोना आटोक्यात आला. तसेच पुढील महिन्यात दोन ॲम्ब्युलन्स परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.’’
डॉ. अनघा राजवाडे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. तसेच सौम्या चौधरी या बालगायकाचे अतिशय सुरेल गाणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. विशाल विधाते यांनी आभार मानले.