कोरोना काळात काम करणाऱ्या परिचारिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:06+5:302021-03-16T04:12:06+5:30
पुणे - क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नगरसेविका आरती सचिन कोंढरे संस्थापित हिरकणी कला मंचाच्या वतीने कोविड ...
पुणे -
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नगरसेविका आरती सचिन कोंढरे संस्थापित हिरकणी कला मंचाच्या वतीने कोविड काळात काम करणाऱ्या परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.
दरवर्षी हिरकणी कला मंचातर्फे महिला दिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्या स्वरूपात आगळ्यावेगळ्या पद्धतीने सर्व नियम पाळून घेतला.
यानिमित्ताने जोशी हॉस्पिटल, भवानी पेठ हॉस्पिटल येथील नर्स इन्चार्ज संगीता निपुणगे यांच्या समवेत २५ नर्सेसला कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले. त्यांना हिरकणी मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली. याच बरोबर कोविड काळात समजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श शिक्षिका ज्योती मानकर, कर्तृत्ववान अधिवक्ता राणिताई कांबळे-सोनवणे आणि समजासेविका प्रमिलाताई जंगम यांचाही विशेष कार्यगौरव करण्यात आला.
"महिलांना त्यांच्या कलागुणांना मुक्त वावर देण्याचे काम हिरकणी करत असते. प्रत्येक महिलेने स्वतःतील रणरागिणी जागृत केली पाहिजे. कोरोनाच्या काळात या सर्व महिलेंनी स्त्रीत्व जागृत ठेवल्यामुळेच आपला देश कोरोनावर मात करू शकला. या सर्वांच्या कार्याला सलाम, " असे कौतुकास्पद उद्गार हिरकणीच्या संस्थापक अध्यक्षा आरती कोंढरे यांनी काढले.
यावेळेस प्रभाग क्र. १८ च्या भाजपा महिला आघाडी अध्यक्षा मधुरा सकपाळ यांच्या समवेत राधा काची, आशा शिंदे सुलभा गुरव, रत्नाताई काळे, शोभा सूर्यवंशी, सुनंदा महामुनी, रंजना शेजवळ, पल्लवी लोखंडे उपस्थित होते.