थेरगाव, कैलासनगरमध्ये गुंडांचा धुडगूस

By admin | Published: June 12, 2016 05:51 AM2016-06-12T05:51:50+5:302016-06-12T05:51:50+5:30

वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याकरिता स्थानिक गुंड कधी वाहनांची जाळपोळ, तर कधी तोडफोड करू लागले आहेत. शहराच्या विविध भागांत या घटना घडू

The hooligan fox in Thergaon, Kailasnagar | थेरगाव, कैलासनगरमध्ये गुंडांचा धुडगूस

थेरगाव, कैलासनगरमध्ये गुंडांचा धुडगूस

Next

वाकड : वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याकरिता स्थानिक गुंड कधी वाहनांची जाळपोळ, तर कधी तोडफोड करू लागले आहेत. शहराच्या विविध भागांत या घटना घडू लागल्या असून, शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास थेरगावातील कैलासनगर भागात रहिवाशांनी घरासमोर लावलेल्या वाहनांवर मोठे दगड फेकले. स्थानिक गुंडांनी धुडगूस घातला. वीसहून अधिक वाहनांचे नुकसान केले.
थेरगावातील कैलासनगरमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घराच्यासमोर वाहन उभे करणेही असुरक्षित ठरत असेल, तर या भागात राहायचे कसे, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. स्थानिक गुंडांच्या टोळक्याने मोटारीच्या काचा फोडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक गुंंडांचे त्यांच्यात वैमनस्य असेल, परंतु आमच्यासारख्या सामान्यांचे नुकसान होते, त्यांच्या वादाची झळ आम्हाला सोसावी लागते आहे, अशा प्रतिक्रिया दीपक लिंबाजी पेटकर यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या मोटारीची पुढची काच फुटली आहे. काही दिवसांपूर्वी या भागात पोलिसांची गस्त होत होती. आता गस्त बंद झाल्यामुळे असे प्रकार घडू लागले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
मोहटा देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या शोभा सुतार यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. घराजवळ लावलेल्या वाहनांवर दगड फेकून नुकसान केले जात असेल, तर वाहन लावायचे कोठे? एकाच रात्रीत सुमारे २०, २५ वाहनांचे नुकसान केले. सामान्यांना अशा प्रकारे त्रास देण्यामागील उद्देश काय असावा, हे कळत नाही. सुनील होळकर यांच्या दोन मोटारींचे नुकसान झाले. एका मोटारीची पुढची आणि पाठीमागची काचसुद्धा फोडली. एक वाहन कंपनीत माल वाहतुकीसाठी लावले होते. (वार्ताहर)

खडकी : २५ ते ३० जणांच्या टोळक्याकडून तोडफोड
खडकी परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी, रिक्षा, टेम्पो, मोटार आदी वाहनांची २५ ते ३० जणांच्या दुचाकीस्वार टोळक्याने तोडफोड केली. हा प्रकार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. या तोडफोडीत सुमारे ३० पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने टोळक्याने हा प्रकार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दुचाकीवरून २५ ते ३० जणांचे टोळके खडकी बाजारात आले. त्यांच्या हातात काठ्या, धारदार शस्त्रे होती. रहिवाशांनी रस्त्याचा कडेला लावलेल्या रिक्षा, टेम्पो आणि मोटारीच्या काचा फोडत हे टोळके निघून गेले. डेपोलाइन, आझाद मित्र मंडळ, ईदगाह मैदान, मेहता टॉवर्स, आकाशदीप सोसायटी आदी भागांतील वाहनांची तोडफोड केली. यामध्ये काही नागरिक जखमी झाले आहेत. तोडफोड करून हे अज्ञात टोळके निघून गेले. या तोडफोडीत सुमारे ३० पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान झाले. दोन महिन्यांपूर्वी तरुणांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्या गटाने शनिवारी तोडफोड केल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी घडलेल्या घटना
१३ जून २०१५ : नेहरुनगरमध्ये वाहनांची तोडफोड आणि घरांवर दगडफेक स्थानिक गुंडांच्या धुडगूसमुळे नुकसान झाले होते.
१८ जून २०१५ : किरकोळ वादातून काळेवाडीत अल्पवयीन मुलांनी रात्री एका चारचाकी मोटारीची तोडफोड केली होती.
७ जुलै २०१५ : बौद्धनगर, भाटनगरमध्ये दोन गटांच्या वर्चस्ववादातून सुमारे १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
२१ आॅक्टोबर २०१५ : संभाजीनगर, शरदनगर आणि चिखली भागात सिनेस्टाइल धुडगूस घातला होता. त्यात १० वाहनांचे नुकसान झाले
२५ नोव्हेंबर २०१५ : आनंदनगरमध्ये दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली. वाहनांचे नुकसान केले.
२० डिसेंबर २०१५ : भोसरी चक्रपाणी वसाहतीत तीन दुचाकी खाक होण्याची घटना घडली.
६ जानेवारी २०१६ : डांगे चौक, थेरगावात वाहनांची तोडफोड करून सशस्त्र दहशत माजविणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली होती.
१४ जून २०१६ : किरकोळ कारणावरून थेरगाव, डांगे चौकात दोघांना मारहाण करून सहाआसनी मोटारीची तोडफोड केली होती.
१४ मे २०१६ : डांगे चौक, थेरगावात वाहनांवर दगडफेक झाली होती.
२ जून २०१६ : प्राधिकरणासारख्या शांत परिसरात मागील आठवड्यात वाहनांवर दगडफेक झाली.

Web Title: The hooligan fox in Thergaon, Kailasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.