कर्करोगग्रस्त रुग्ण आणि कुटुंबियांसाठी ‘आशा हमेशा’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:32+5:302021-02-06T04:16:32+5:30
पुणे : कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना विनामूल्य पॅलिएटिव्ह केअर पुरवणा-या सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटरतर्फे जागतिक कर्करोग ...
पुणे : कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना विनामूल्य पॅलिएटिव्ह केअर पुरवणा-या सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘आशा हमेशा’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे आधीच्या टप्प्यात पॅलिएटिव्ह केअरचे महत्त्व आणि कर्करोगाचे रूग्ण, तसेच कुटुंबियांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित केला जाणार आहे.
जागतिक कर्करोग अहवालानुसार, भारतात १.१६ दशलक्ष नवे कॅन्सरचे रूग्ण आहेत. मात्र फक्त ४ टक्के रुग्णांना वेदनांपासून मुक्ती मिळते, असा अंदाज आहे. त्यामुळे कर्करोगाचे बहुतेक रूग्ण शारीरिक आणि मानसिक तणावाखाली जगतात. यावर समग्र आणि बहुआयामी पॅलिएटिव्ह केअर सेवा उपाय ठरू शकते. त्यांच्या उपचाराच्या आधीच्या टप्प्यात हे जास्त लाभदायक ठरू शकते. त्याबाबत जनजागरुकता करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
मोहिमेअंतर्गत अनेक राष्ट्रीय व स्थानिक कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंसेवी कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. या आठवड्यात ‘अर्ली इंटीग्रेशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर’ या विषयावरील व्हर्च्युअल गोलमेज परिषदेने मोहिमेला सुरूवात होणार आहे.
सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अँड ट्रेनिंग सेंटरच्या विश्वस्त रुमाना हुमेद म्हणाल्या, ‘कर्करोग तज्ञ डॉक्टरांमध्ये नव्याने संवाद सुरु होण्यासाठी तसेच परस्पर सहकार्याचे नवे सत्र सुरु होण्यासाठी या मोहिमेचा निश्चितच उपयोग होईल. त्याचबरोबर कर्करोग रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये, पॅलिएटिव्ह सेवा पुरवठादार, कर्करोग रूग्ण आणि त्यांची काळजी घेणा-या व्यक्ती यांच्यातही जनजागृती होऊ शकेल.’