पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा
By admin | Published: March 9, 2016 12:48 AM2016-03-09T00:48:14+5:302016-03-09T00:48:14+5:30
भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर
राजगुरुनगर : भामा-आसखेड धरणातून पुण्याला पाणी नेण्याच्या योजनेमुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. आळंदीचा पाणीप्रश्नही सुटण्याच्या मार्गावर असल्याने ही योजना म्हणजे धरणग्रस्तांसाठी आणि आळंदीवासीयांसाठी इष्टापत्ती ठरू शकेल. मात्र, या धरणातून शेतीला पाणी मिळण्याची शक्यता आता मावळत चालली आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न व पुण्यासाठीच्या पाण्याची पाईपलाईन या संदर्भात पालकमंत्री गिरीष बापट यांनी आज मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत भामा आसखेड प्रकल्पांतील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी येत्या ८ दिवसांत अॅक्शन प्लॅन करून सादर करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
भामा आसखेड धरणाचे पाणी पुण्याला देण्यावरून निर्माण झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक फिसकटली होती तेव्हापासून काम बंदच होते.
पुण्याच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने काम सुरु व्हावे असा प्रशासनावर दबाव होता, तर दुसर्या बाजूला धरणग्रस्तांचे प्रश्न सुटल्याशिवाय पाणीयोजनेचे काम करू देणार नाही अशी खेडच्या लोकांची भूमिका होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीत निर्णय झाले. यामुळे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे.
संपादित झालेली पण बुडीत क्षेत्रात न गेलेली जमीन शेतक-यांना परत देणे या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न शिल्लक आहेच. शेतीला पाणी देण्याबाबत शासन काय भूमिका घेणार आणि कालवे करणार कि नाही ? याबाबतही आता उत्सुकता आहे.