आशादायी! पुण्यात चोवीस तासांत एकही मृत्यू नाही; रुग्णसंख्या २६३ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 09:22 PM2020-04-11T21:22:19+5:302020-04-11T21:44:42+5:30
पुणे जिल्ह्यातील शनिवारी एकही मृत्यू झाला नसली तरी रुग्णसंख्येत १२ ने वाढ
पुणे : मागील काही दिवसांत दररोज मृत्यूचा आकडा वाढत चालल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण जिल्ह्यातील नागरिकांसाठी शनिवार दिलासादायी ठरला. दिवसभर जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री येरवडा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९ वर गेला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू दि. ३० मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात झाला होता. त्यानंतर दि. ६ एप्रिलपर्यंत दररोज एक-दोन मृत्यू होत होते. पण दि. ७ एपिलला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला. तर दि. ८ एप्रिलला हा आकडा थेट ९ वर गेला. दि. ९ एप्रिल रोजीही ५ जणांचा तर शुक्रवारी (दि. १०) तीन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. एकुण २९ मृतांपैकी २६ जण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर उर्वरीत तीन जण बारामती, श्रीरामपुर व ठाणे येथील रुग्ण होते. या वाढत्या आकड्यांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाचा संसर्ग तसेच मृतांचा आकडा वाढू लागल्याने प्रशासनाकडूनही अनेक बंधने लावली जात आहेत. पण शनिवारी मात्र जिल्ह्यात एकाही मृत्यू नोंद झाली नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा येरवडा येथील ६४ वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या महिलेला दि. ९ रोजी खासगी रुग्णालयातून ससुनमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. या महिलेला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
---------------------
रुग्णसंख्या २६३ वर
पुणे जिल्ह्यातील शनिवारी एकही मृत्यू झाला नसली तरी रुग्णसंख्येत १२ ने वाढ झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांच्या तुलनेत ही वाढही कमी आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या २६३ वर पोहचली आहे. त्यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात २२२, पिंपरी चिंचवडमध्ये २९ तर ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात ९ तर पिंपरीमध्ये ३ असे एकुण १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.