खेडवासीयांच्या आशा पल्लवीत

By admin | Published: July 16, 2017 03:41 AM2017-07-16T03:41:00+5:302017-07-16T03:41:00+5:30

पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरू आहे. जागा शोधण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात विकासाच्या

The hopes of the villagers have flourished | खेडवासीयांच्या आशा पल्लवीत

खेडवासीयांच्या आशा पल्लवीत

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरू आहे. जागा शोधण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा मानाचा तुरा मानले जाणाऱ्या विमानतळाची दिशा पुन्हा एकदा खेड-शिरूर भागात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चाकण किंवा खेड-शिरूर भागात विमानतळ होणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने मागील तीन-चार वर्षांत सर्वेक्षणही करण्यात आले होते. चाकण, भोसरी, खेड, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याला या विमानतळाचा फायदा झाला असता. त्याचबरोबर मुंबई-नाशिकला जवळ असे, या भागातील विमानतळ ठरले असते. त्यादृष्टीने विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. परंतु राजकीय व शासकीय उदासीनतेची ‘माशी शिंकली’ आणि या भागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ तांत्रिक अडथळ््याचे कारण देत पुरंदर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा एकदा खेड ‘सेझ’ भागात विमानतळ होईल, अशी अपेक्षा राजकीय व शासकीय पातळीवर व्यक्त होत आहे. या भागातील ‘सेझ’ संपादित जमिनीत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सर्व्हे २०१५ मध्ये झाला आहे. त्यातील त्रुटी दूर झाल्यास पुन्हा एकदा विमानतळाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चाकणजवळील सातगावात सुरुवातीला विमानतळासाठी सर्वेक्षण झाले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने चाकणऐवजी दुसरी जागा शोधण्याची सूचना केली. केंदूर, निमगाव, दावडी, कन्हेरसर या भागातील काही जागेचा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व्हे करण्यात
आला होता.

विमानतळ आले तर लोकांच्याच हिताचे : सुरेश गोरे
खेड विभागामध्ये विमानतळ येण्याबाबत सध्या तरी कुठलाही निर्णय झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र लोकांच्या आशा आकांक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत, हे खरे. जर विमानतळ खेडमध्ये आले तर चांगलेच आहे. ते लोकांच्या हिताचेच ठरेल. परंतु त्यासाठी लोकांची जमीन देण्याची तयारी असायला हवी. खेडमध्ये आता जी जमिन शिल्लक आहे त्यामध्ये विमानतळ होऊ शकते का हे पाहावे लागेल. परंतु विमानतळ होण्यासाठी जनमताचा रेटा मात्र लागेल.

सेझ, विमानतळ, रेल्वेच्या गाजराने गुंतवणूकदार हैराण
मागील आठ वर्षांत खेड व शिरूर भागात सेझचे १७ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ५ गावांत संपादन झाले. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी या भागात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यातच विमानतळ व नंतर रेल्वेच्या सर्व्हेनंतर खेड व शिरूर भागात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमीन खरेदी विक्रीत झाली. परंतु अचानक रात्रीतून विमानतळ व रेल्वे दुसरीकडे गेल्याने गुंतवणूकदारांच्या झोपा उडाल्या आहेत. या भागातील विकासाला मोठी खीळ बसली आहे. पुन्हा एकदा विमानतळाच्या चर्चेने या भागात दिलासा मिळाला असून सेझ, विमानतळ, रेल्वेचे गाजर मात्र सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकवत आहे.

Web Title: The hopes of the villagers have flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.