हाॅर्माेन रिप्लेसमेंट थेरपीमुळे हाेणार मेनाॅपोजच्या त्रासातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:50 PM2024-01-31T12:50:45+5:302024-01-31T12:55:01+5:30
या संपूर्ण त्रासापासून आता स्त्रियांची पूर्णत: सुटका होणार आहे. नव्याने विकसित झालेली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वरदान ठरणारी आहे....
- अंकिता कोठारे
पुणे : स्त्रियांच्या आयुष्यात मेनाॅपोज हा काळ अत्यंत खडतर मानला जातो. या काळात स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिकदृष्ट्या बदल होत असतात, तर अनेक स्त्रिया मेनोपोजचा काळ सुरू होणार म्हणून धास्ती घेतात. त्यामुळे त्यांच्यातील हार्मोनल बदल अस्वस्थ करणारे असतात. या संपूर्ण त्रासापासून आता स्त्रियांची पूर्णत: सुटका होणार आहे. नव्याने विकसित झालेली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी वरदान ठरणारी आहे.
पूर्वी जेव्हा स्त्रिया तपासणीसाठी डाॅक्टरकडे जायच्या, तेव्हा प्राथमिक उपचारानंतर डाॅक्टर त्यांना फेरतपासणीचा सल्ला देत. मात्र, बहुतांश महिलांकडून या सल्ल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसे. साहजिकच गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उपचारासाठी पुन्हा येणाऱ्या महिलांवर विशिष्ट थेरपी वा ट्रिटमेंट करण्यास स्त्रीराेगतज्ज्ञ तयार हाेत नसत. आता काळ बदलला आहे. अनेक महिला स्वतःची काळजी घेण्यास स्वत:हून पुढे येत आहेत. त्यामुळे डॉक्टरसुद्धा आवश्यक असणाऱ्या महिलांना हार्माेन रिप्लेसमेंट थेरपीजसारख्या थेरपी वा ट्रिटमेंट घेण्यासाठी स्वत:हून शिफारस करतात. याला महिलांकडूनसुद्धा चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
स्त्रियांचा मेनाॅपोजनंतरचा जीवनाचा काळ वाढत आहे. अशावेळी मेनाॅपोजनंतरची किमान वीस ते तीस वर्षे स्त्रियांना चांगली जीवनशैली मिळणे अतिशय गरजेचे झाले आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एचआरटी त्वचेवर लावायचा पॅच किंवा स्प्रे या स्वरूपात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्याचे संभाव्य धोके खूप कमी झाले आहेत. पॅच किंवा स्प्रेमुळे आता ही औषधे यकृताकडे जात नाहीत आणि त्यामुळे रक्तात गुठळ्या होण्याची शक्यताही कमी होते. मेनोपोजचा त्रास सर्व स्त्रियांना होईलच असे नाही; पण काही स्त्रियांना हा त्रास जीवघेणा आणि आयुष्यातला रस काढून घेणारा ठरू शकतो. त्यामुळे हा उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला महिलांनी आवर्जून घ्यावा, असा सल्लादेखील स्त्रीरोगतज्ज्ञ देतात.
मेनाॅपोजची प्रमुख लक्षणे -
- हॉट फ्लशेस, हाडे ठिसूळ होणे, अंगदुखी, झोप न लागणे, ऊर्जाहीनता, कधीकधी बौद्धिक क्षमतेवर परिणाम