खळबळजनक..! एअर फोर्स शाळेच्या मैदानावर आढळली इम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:00 AM2019-05-15T07:00:00+5:302019-05-15T07:00:05+5:30
लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मंगळवारी सकाळी इंम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू सापडली़.
पुणे : लोहगाव येथील एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मंगळवारी सकाळी इंम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड सदृश्य स्फोटक वस्तू सापडली़. संरक्षित क्षेत्रात स्फोटक वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली होती़. सुरुवातीला हा हँड ग्रेनेड असल्याचे वाटल्याने पोलीस तसेच वायु दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली़. बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही स्फोटक वस्तू दुपारी १२ वाजता निकामी केली़ त्यात आढळलेल्या दारूचा नमूना रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे़.
याबाबतची माहिती अशी, एअर फोर्सच्या शाळेच्या मैदानात मुले खेळत होती़. सकाळी साडेनऊ वाजता त्यांना एक संशयास्पद वस्तू आढळून आली़. त्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली़. वायु दलाचे विंग कमांडर पी़. एऩ. सिंग यांनी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी विमानतळ येथील गेट गणपती चौकात हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू असल्याचे बॉम्बशोधक व नाशक पथकाला कळविली़. त्यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर हा हँड ग्रेनेड सदृश्य स्फोट वस्तू निकामी केली़. त्यानंतर त्यांनी पथकाने तेथील साधी माती, स्फोटक मिश्रित माती, संशयित वस्तूच्या आवरणाचे तुकडे व इतर घटक पुढील तपासणीसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़. त्याचा पंचनामा करण्यात आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी ते तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळेकडे पाठविले़.
याबाबत पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी गेले़. सुरुवातीला ती वस्तू हँड ग्रेनेडसारखी वाटत होती़. ती वस्तू निकामी केली आहे़. त्याचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे़. त्याच्या तपासणीनंतरच ती वस्तू नेमकी काय होती हे समजून येईल़. संरक्षित क्षेत्रात ही संशयित वस्तू कशी याची याचा तपास हवाई दलाकडूनही घेतला जात आहे़.
असा केला ईम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड निकामी
बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले़. यावेळी हवाई दलाचे अधिकारी, वायू सेनेची बॉम्बशोधक पथक उपस्थित होते़. आर्मी स्कुलच्या मैदानाची पाहणी केली़ तेव्हा तेथे स्फोटक मिश्रित माती आढळून आली़ या मातीला श्वान विराटद्वारे पाहणी केली असता त्याने स्फोटक असल्याचे संकेत दिले़ त्याची तांत्रिक उपकरणाने तपासणी केल्यावर त्यात इलेक्ट्रॉनिक जंक्शन असल्याचे संकेत मिळाले़. त्यानंतर ईव्हीडी द्वारे संशयित वस्तूची पाहणी केली असता त्यातही स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले़. त्यानंतर विराट श्वाननेही स्फोटके असल्याचे संकेत दिले़.
ही संशयित वस्तू ईम्प्रोव्हाईज हँड ग्रेनेड असल्याचे निष्पन्न झाल्याने ती जागेवरच निकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला़. त्यानुसार हवाई दलाच्या परवानगीनंतर ती कारटेल्स मेथेड ओपनिंगचा वापर करुन जागेवरच निकामी करण्यात आली़. ही सर्व प्रक्रिया सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत पार पाडण्यात आली़.
़़़़़़़़
तो दिवाळीतील फटाका नाही , फटाका विक्रेत्यांची ग्वाही
लोहगाव येथील हवाई दलाच्या आर्मी स्कुलच्या मैदानात सापडलेली वस्तू ही दिवाळीतील शोभेच्या फटाक्यासारखी असल्याचे सांगितले जात होते़. याबाबत शहरातील फटाका विक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांना त्याची छायाचित्रे दाखविली असता त्यांनी अशाप्रकारे फटाके बाजारात नाही़. त्यामुळे ही वस्तू दिवाळीतील फटाकापैकी आहे असे म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले़.