मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात; दोन जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 10:37 AM2022-11-07T10:37:07+5:302022-11-07T10:37:14+5:30
या घटनेतील मृत व जखमी हे रेल्वेचे लोको पायलट असल्याची प्राथमिक माहिती...
लोणावळा (पुणे) : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरच्या खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बसच्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत व जखमी हे रेल्वेचे लोको पायलट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कुमार गौरव गौतम (वय २६), शत्रूंजय त्रिपाठी (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक अशी जखमींची नावे आहेत.
रेल्वेचे कर्मचारी लोणावळा येथील वेट अँड जॉय या वॉटर पार्कमध्ये सुटी व्यतीत करून खोपोली रेल्वेस्टेशनकडे रिक्षामधून (क्रमांक एमएच १४ एचएम ५२९६) जात असताना, बोर घाटातील सायमाळ जवळच्या वळणावरील उतारावर रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन खोपोलीकडून पुण्याकडे निघालेल्या (क्रमांक एमएच ०४ जी ९९२५) या प्रवासी बसला धडकली. या अपघातात रिक्षामधील कुमार गौरव गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. शत्रूंजय त्रिपाठी या युवकाला उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. तर राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक हे जखमी झाले तर रिक्षाचालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाल्यानंतर त्वरित सहायक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर व त्यांचे कर्मचारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहाेचले. त्यांनी सर्वांच्या सहायाने मदतकार्य करून जखमींना रुग्णवाहिकेतून पुढे हलवले. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक पोलीस बोरघाट डिव्हिजनचे पोलीस सबइन्स्पेक्टर अनिल शिंदे आणि डेल्टा फोर्सच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली.
अपघातातील जखमी राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे सहायक लोको पायलटपदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. तर कुमार गौरव गौतम आणि शत्रूंजय त्रिपाठी हेदेखील सहायक लोको पायलटपदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते.
रिक्षाचालक हा लोणावळा येथील रहिवासी असून तो खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे अपघाताचा तपास करत आहेत.