जुन्नरमध्ये बिबटयाची दहशत

By admin | Published: May 27, 2015 11:15 PM2015-05-27T23:15:49+5:302015-05-27T23:15:49+5:30

पिंपळगाव जोगा येथील बोकडदरा येथे राहणाऱ्या सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेस घरापासून उचलून नेऊन बिबट्याने जंगलात ठार केले.

The horror of a leopard in Junnar | जुन्नरमध्ये बिबटयाची दहशत

जुन्नरमध्ये बिबटयाची दहशत

Next

हल्ल्यात महिला ठार
मढ/ओतूर : जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत संपता संपेना. त्याचे माणसांवरचे हल्ले सुरूच असून मंगळवारी (दि. २६) पिंपळगाव जोगा येथील बोकडदरा येथे राहणाऱ्या सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेस घरापासून उचलून नेऊन बिबट्याने जंगलात ठार केले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या बाबत ओतूरचे वनक्षेत्रपाल एस.एस. रघतवान व पिंपळगाव जोगा येथील वनसेवक डी.एस.कदम यांनी माहिती दिली की, पिंपळगाव जोगा, बोकडदरा येथे सखुबाई या रात्री १० च्या सुमारास घराबाहेर लघुशंकेसाठी बसल्या होत्या. तेव्हा बिबट्याने हल्ला करुन त्यांना उचलून जंगलाच्या दिशेने नेले. आवाज येताच घरच्यांनी पाहिले व नाना हरिभाऊ हिले व गोंविद नाना हिले यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. परंतु, बिबट्या त्यांना चकवून जंगलात पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव जोगा ग्रामस्थ, ओतूर वनक्षेत्र कर्मचारी व ओतूर पोलीसांनी जंगल परिसरात शोधकार्य सुरूकेले. तब्बल पाच तासांनी पहाटे तीनच्या सुमारास सखुबाई हिले यांचा मृतदेह जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत त्यांच्या घरापासून साधारणत: ५०० मीटर अंतरावर आढळला. ओतूर येथे शवविच्छेदन करुन तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. घटनेच्या ठिकाणी रात्रीच जुन्नरचे उपवनसंरक्षक वि.अ. धोकटे, सहायक वनसंरक्षक वाय.एल. केसकर यांनी भेट दिली.
पिंपळगाव जोगातील बोकडदरा ही वस्ती डोंगराच्या जवळ पायथ्याला जंगलाजवळच आहे. पाच-सहा घरांची वस्ती व घरेही अंतरा-अंतरावर आहेत. सखुबाई हिले यांच्या घरात पती नानाभाऊ हिले, मुलगा गोविंद हिले, सून वृषाली हिले तर नात प्राजक्ता हिले व साहिल हिले असा परिवार राहतो. बिबट्याने सखुबाईंना घरापासूनच उचलून नेल्याने येथे राहणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पीडित कुटुंबाला वनविभागाकडून तातडीची एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पिंपळगाव जोगातील वाड्यावस्त्यांवर पाहणी करून आजच तीन पिंजरे लावणार आहेत. डिंगोरे, ओतूर, खामुंडी या परिसरात आठ पिंजरे लावलेले आहेत. जंगल परिसर एकदम जवळ असल्याने संगमनेरवरून अधिक पाच पिंजरे मागविण्यात आले आहेत. तेही लवकरच लावण्यात येतील. बोकडदरा परिसरात ट्रॅप लावण्यात येणार असून, ट्रॅप कॅमेरेही बसवणार आहे.
- एस. एस. रघतवान,
वनपरिक्षेत्र अधिकारी

४लोकांनी घराजवळील परिसरात लाइट सुरू ठेवावेत, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, शेतात व इतर ठिकाणी समूहाने फिरावे, सोबत मोठ्या आवाजाचे यंत्र वापरावे, पाळीव व दुभत्या जनावरांचा
गोठा बंदिस्त करावा, बिबट्याचा वावर अढळला, तर त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
४वीज महामंडळाने या बिबट्याप्रवण क्षेत्रात रात्रभर सिंगल फेज लाइट द्यावी; दिवसा शेतीपंप चालविण्यासाठी थ्री फेज मोटारची पूर्ण क्षमतेने लाइट द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The horror of a leopard in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.