माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 01:12 PM2019-06-15T13:12:33+5:302019-06-15T13:16:56+5:30
‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील.
आळंदी : माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वैभव असलेला ‘श्रीं’चा ‘मोती’ अश्व तसेच मानाचा जरीपटक्याचा ‘हिरा’ या अश्वांचे अलंकापुरीतील सोहळ्यासाठी अंकली (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) येथून श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून हरिनाम गजरात प्रस्थान झाले.
‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हा मानाचा अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील. पालखी सोहळ्याच्या वैभवात वाढ करणाऱ्या अश्वांचे प्रस्थान झाल्यानंतर अंकलीत ग्रामप्रदक्षिणा, महाप्रसाद उत्साहात झाला. अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात नऊच्या सुमारास अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात झाली. या वेळी जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. अश्वांची श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. दिंडी व ‘श्रीं’चा अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून औक्षण केले. ‘श्रीं’चे अश्व दर्शनास भाविक, नागरिकांनी या वेळी गर्दी केली. अंकली गावातून प्रथापरंपरांचे पालन करीत पारंपरिक मार्गावरून अश्व मिरवणूक वेशीत आल्यानंतर अश्वांना नामगजरात निरोप देण्यात आला.
‘श्रीं’चे अश्व प्रस्थानाप्रसंगी आळंदीहून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, ज्ञानेश्वर गुळूंजकर, सत्यवान बवले, संजय बवले, अजित मधवे, पुणे येथून शंकर मोकाटे, विजय मोकाटे, सचिन तिकोणे, राजाभाऊ थोरात, मोरेश्वर गायकवाड, अतुल नाझरे, बसवप्रसाद जोल्ले, शिवराज जोल्ले, अश्वत्थ शितोळे सरकार, तुकाराम पाटील, संजय चौधरी, विवेक कमते यांच्यासह अंकली, जुगूळ, चंदूर, मांजरीवाडीतील भाविक, वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रींच्या अश्वाला ३०० किलोमीटरचा प्रवास
* रिंगण सोहळ्याचे आकर्षण असलेले ‘श्रीं’चे अश्व सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून आळंदीत दोन दिवस मुक्कामी राहणार आहेत. यातील दुसऱ्या दिवशी ‘श्रीं’चे पालखी सोहळ्याचे प्रस्थान २५ जून रोजी होणार आहे. ‘श्रीं’चे प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा अश्वांचा आळंदी ते पंढरपूर सोहळ्यात प्रवास होणार आहे.
* गेल्या १८७ वर्षांची परंपरा श्रीमंत शितोळे सरकार घराण्याने जपली आहे. याही वर्षी ही परंपरा व माऊलींची सेवा करण्यास शितोळे सरकार सज्ज झाले आहेत. या वारीतदेखील नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडणार असल्याचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी सांगितले.