कर्मयोगी साखर कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरातीमागुन घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:34+5:302021-09-23T04:11:34+5:30

कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस राहिले असताना ...

Horses behind the NCP show at Karmayogi Sugar Factory | कर्मयोगी साखर कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरातीमागुन घोडे

कर्मयोगी साखर कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरातीमागुन घोडे

googlenewsNext

कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांची चाचपणी बैठक घेतली व सक्षम उमेदवार मिळाल्यास पॅनेल तयार करण्यात येईल, अशी घोषणा केल्याने वरातीमागुन घोडे, असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे.

तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची एकहाती निर्विवाद सत्ता आहे. या कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी तत्कालीन पतित पावन संघटनेचे नेते व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पतित पावन संघटनेत असताना त्यांनी १९९४ व ९९ ला सत्ताधारी पाटील गटाच्या विरोधात पॅनल तयार करून आव्हान दिले. नंतरच्या काळात २००५ व १० साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिग्गज नेते मंडळी उभी राहिली; मात्र त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडने समझोता करण्याचा सल्ला दिल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभी करण्यात अपयश आले. पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होऊन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले.

आता होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस राहिले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल तयार करण्यासाठी पक्षाच्यावतीने बुधवार (दि.२२) सप्टेंबर रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. २४ सप्टेंबर हा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे यावेळी कारखाना क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आली. निवडणूक लढवावी, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली; मात्र सक्षम उमेदवार मिळाल्यास पॅनेल तयार करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

त्यामुळे तालुक्यातील महत्त्वाचा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चार महिन्यात दोनदा निवडणूक कार्यक्रम लागूनही गाफिल का राहिली, याचे कोडे सर्वसामान्य सभासदांना पडले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सदस्य प्रताप पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे उपस्थित होते.

चौकट ,

भरणे, माने, पाटील यांचा प्रभाव...

कर्मयोगी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी नेते विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांचा प्रभाव आहे; मात्र आजच्या चाचपणी बैठकीला पाटील वगळता अन्य नेते अनुपस्थित होते, त्यामुळे कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येते.

Web Title: Horses behind the NCP show at Karmayogi Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.