भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 07:00 AM2018-12-21T07:00:00+5:302018-12-21T07:00:02+5:30

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला.

The hospital build up for poor persons free treatment by selling vegetables | भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय 

भाजीपाला विकून गरिबांसाठी मोफत उपचारासाठी उभारले रुग्णालय 

Next
ठळक मुद्देसुभासिनी मिस्त्री यांचे कार्य : पैसे नसल्याने पतीचा झाला होता मृत्यू ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामे करून महिन्याला १०० रुपये मिळतआईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहान मुलाने मिळवली डॉक्टरची पदवीभारत सरकारकडून त्यांच्या या कार्याचा गौरव यंदा पद्मश्री पुरस्कार देऊन

पुणे : पतीला योग्य उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना अवघ्या तेविसाव्या वर्षी वैधव्य आले. सोबत चार लहान मुलांची जबाबदारी होती. अशा स्थितीत त्यांनी गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी रुग्णालय उभारण्याचा निर्धार केला. भाजीपाला विकून, धुणीभांडी करून २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी पैसे जमा केले. मुलाला अनाथालयात ठेवून डॉक्टर बनवले आणि शेवटी जमवलेल्या पैशातून ज्या गावात पतीचा मृत्यू झाला. तिथेच मोठे रुग्णालय उभे केले. तिथे आता गरिब रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. या निश्चयाच्या महामेरू आहेत पश्चिम बंगालच्या ७५ वर्षीय सुभासिनी मिस्त्री. 
पुण्यात गुरूवारी (दि.२१) आरोग्य महोत्सव होत असून त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला व त्यांनी आपला जीवनपट उलगडला. 
अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी यांचे लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुले खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. वेळेवर त्यांच्या पतीला उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. तेव्हा सुभासिनी यांचे वय २३ होते. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री यांनी ठरवले की, असे हॉस्पिटल काढायचे ज्यात गरिबांना मोफत उपचार मिळेल. तेव्हा त्यांच्या या निर्णयावर अनेक जण हसले होते. पण ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडेच मी हॉस्पिटल काढेन, असे त्यांनी तेव्हा निक्षून सांगितले.
तेव्हा चार मुलांची जबाबदारी पण त्यांच्यावर होती. हॉस्पिटल तर सोडाच पण स्वत:च घर नीट करून दाखव अशी लोकांनी त्यांची अवहेलना केली होती. पण सुभासिनी मिस्त्री यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची कामे करून महिन्याला १०० रुपये मिळत होते. आपल्या मुलांना त्यांनी अनाथाश्रमात ठेवले आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. बँकेत आपले खाते सुरु केले. आपल्या मुलांची शिक्षण आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते बँकेत टाकले. तब्बल २० वर्ष हे काम प्रामाणिकपणे करत राहिल्या. 
१९९२ साली सुभासिनी मिस्त्री यांनी हन्सपुकुर या गावात १० हजार रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी मिळवली होती. मग काय लोक येत गेली आणि कारवाँ बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्युम्यानिटी हॉस्पिटलने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता. 
.........................


आज पूर्ण अद्ययावत रुग्णालय उभे
ह्युम्यानिटी हॉस्पिटलच नाव सगळीकडे पसरले आहे. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या आहेत. एका वर्षाच्या आत ह्युम्यानिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाले. आज हे हॉस्पिटल पूर्णत: अद्यावत असून ह्यात ऑपरेशन थेटर, सोनोग्राफी, एक्स रे आणि इतर विविध उपकरणांनी सज्ज आहे. या हॉस्पिटलच एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे. 
........................
पैशाविना उपचार नाकारू नका...
भारत सरकारने त्यांच्या या कार्याचा गौरव करून यंदा त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन केला आहे. हा पुरस्कार मिळाल्यावर त्या म्हणाल्या, देशातील सर्व रूग्णालयांनी रुग्ण आला तर पैसे नाहीत म्हणून त्याला परत पाठवू नये. माझ्या पतीचे या कारणाने मृत्यू झाला. इतरांचे असे होऊ नये, हीच भावना आहे.
........................
साध्या वेशात स्वीकारला पद्मश्री पुरस्कार 
पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लीपरवर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. जेव्हा आमच्या हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा मला माझ्या कामाचा पुरस्कार मिळाला, अशा त्यांच्या भावना होत्या. 
........................
आज आरोग्य चित्रपट महोत्सव 
पी. एम. शहा फांऊडेशनतर्फे शुक्रवारी आणि शनिवारी आरोग्य चित्रपट महोत्सव होत आहे. या महोत्सवाचे उदघाटन सुभासिनी मिस्त्री यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी २ वाजता लाँ कॉलेज रोडवरील नॅशनल फिल्म अर्काइव्हमध्ये होणार आहे. या महोत्सवात आरोग्य विषयक चित्रपट दाखविण्यात येतील.   

Web Title: The hospital build up for poor persons free treatment by selling vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.