दस्तुरखुद्द डीनच करीत होते माफिया ललित पाटीलवर उपचार; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 06:07 AM2023-10-28T06:07:05+5:302023-10-28T06:07:28+5:30
आराेपी ललितवर अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याच्यावर ससून रुग्णालयामध्ये सलग चार महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार सुरू होते. गोपनीय बाब असल्याच्या नावाखाली ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी याविषयी आजवर बोलणे टाळले होते. अखेर पाेलिसांनीच कैदी वॉर्डमधील वैद्यकीय नोंदी ताब्यात घेतल्या असता धक्कादायक बाब समाेर आली आहे. आराेपी ललितवर अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर हे स्वत:च उपचार करीत असल्याचे वैद्यकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
ललितला मूत्रपिंड विकार (हर्निया) होता. त्याच्यावर अधिष्ठाता डॉ. ठाकूर हेच उपचार करीत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात जिन्यावरून पडून जखमी झाल्याची बतावणी करणाऱ्या ललितचे तीन वर्षांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील चौकशी अहवाल अखेर शुक्रवारी सरकारला सादर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व चाैकशी समितीचे अध्यक्ष डाॅ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
महिला सहायक निरीक्षक निलंबित
ड्रग्ज माफिया ललितने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळ काढला. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी आणखी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश काढले. सहायक पोलिस निरीक्षक सविता हनुमंत भागवत असे या निलंबित महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
माजी महापौर पांडेंची १५ मिनिटे चौकशी
नाशिक : ललित पाटीलप्रकरणी माजी महापौर विनायक पांडे यांची अखेर गुन्हे शाखेने शुक्रवारी दहा ते पंधरा मिनिटे बंद दरवाजाआड चौकशी केली. या चौकशीत आपण ललित पाटीलसह आपल्या मोटारीवर असलेला चालक परदेशी याच्याशी काही वर्षांपूर्वीच संबंध तोडल्याचे स्पष्ट केल्याची माहिती पांडे यांनी यावेळी दिली.