हॉस्पिटल्सची अग्निसुरक्षा वा-यावर; फायर एनओसी शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 05:59 AM2018-02-14T05:59:26+5:302018-02-14T05:59:38+5:30
शहरातील सोसायट्या आणि शाळांसह हॉस्पिटल्सलादेखील अग्नीशमनचे कवच आहे की नाही, याची माहितीच अग्नीशमन दलाला नसल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल्सचा अग्नीशमनचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले की नाही, याची माहिती शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर अग्नीशमन विभागाकडून देण्यात आले आहे.
पुणे : शहरातील सोसायट्या आणि शाळांसह हॉस्पिटल्सलादेखील अग्नीशमनचे कवच आहे की नाही, याची माहितीच अग्नीशमन दलाला नसल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल्सचा अग्नीशमनचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले की नाही, याची माहिती शोधण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर अग्नीशमन विभागाकडून देण्यात आले आहे.
राज्यातील विविध ठिकाणी अग्नीतांडवांच्या अनेक घटना अलीकडील काही महिन्यांत घडल्या आहेत. त्यात सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीबरोबरच जीवित हानी झाली आहे. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम २००६ अन्वये प्रत्येक शाळा महाविद्यालये, रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींना अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. शहराचे अग्नीकवच असलेल्या अग्नीशमन दलाकडे मात्र याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केले आहे.
शहरातील बोटावर मोजण्या इतक्या शाळांनादेखील अग्नीशमन यंत्रणेचे कवच नाही.
अग्नीशमन यंत्रणांकडून शहरातील शेकडो शाळांपैकी अवघ्या २७ शाळांनीच अतिंम ना हरकत दाखला घेतला असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. शहरात महापालिकेच्याच २९७ शाळा आहेत.
खासगी शाळांची संख्या तर कितीतरी अधिक आहे. मात्र, अग्नीशमन विभागाकडे केवळ २०१० ते २०१७ या कालावधीतील अवघ्या १४६ शाळा, महाविद्यालये आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इमारतींच्या ना हरकत प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध आहे.
असाच प्रकार शहरातील गृहनिर्माण सोसायटी अथवा रहिवासी इमारतींबाबत आहे. अग्नीशमन विभागाकडे शहरातील किती सोसायट्यांनी अथवा इमारतींनी अग्नीशमनचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले याची काही माहितीच नाही.
किती इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे याची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध झाल्यास देण्यात ती देण्यात येईल, असे उत्तर अग्नीशमन विभागाकडून देण्यात आले होते.
रुग्णालयांच्याबाबतही तेच ठराविक उत्तर देण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी शहरातील किती हॉस्पिटल्सला अग्नीशमनचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती विचारली होती.
तसेच या ना हरकत प्रमाणपत्राच्या अटी व शर्तीची प्रत मिळावी, या शिवाय एनओसी न घेतल्याने किती हॉस्पिटल्सला नोटीसा पाठविण्यात आल्या, याची माहिती मागण्यात आली होती. या सर्व प्रश्नांना एकच उत्तर देण्यात आले आहे.
‘सदरची माहिती शोधण्याचे काम सुरू आहे. माहिती उपलब्ध झाल्यास आपणास देण्यात येईल.’ अग्नीशमन दलाचे माहिती अधिकारी तथा सहायक विभागीय अधिकारी द. ना. नागलकर यांनी ही माहिती दिली आहे.