दहा लाख रुग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2016 04:41 AM2016-01-03T04:41:03+5:302016-01-03T04:41:03+5:30
महापालिकेच्या ४० दवाखाने, १५ प्रसूतिगृहांमधून गेल्या ८ महिन्यांत १० लाख ९ हजार रुग्णांनी उपचार घेतला, त्याचबरोबर ७ हजार १७८ रुग्णांवर शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत मदत करण्यात
पुणे : महापालिकेच्या ४० दवाखाने, १५ प्रसूतिगृहांमधून गेल्या ८ महिन्यांत १० लाख ९ हजार रुग्णांनी उपचार घेतला, त्याचबरोबर ७ हजार १७८ रुग्णांवर शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत मदत करण्यात आल्याचा लेखाजोखा आरोग्य विभागाने सादर केला आहे.
आगामी २०१६-१७ वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत प्रत्येक विभागाकडून त्यांची गेल्या ८ महिन्यातील कामगिरी व त्यांना आगामी वर्षात आवश्यक असलेला निधी यांची माहिती मागवण्यात आला आहे.
शहरामध्ये महापालिकेचे ३९ दवाखाने, १५ प्रसूतिगृह, १ मोठे हॉस्पिटल व १ सांसर्गिक रोगांचे रुग्णालय आहे. एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत ९ लाख ९७ हजार ७६८ रुग्णांनी बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतला. या रुग्णालयांमधून ३ हजार २८९ लहान-मोठ्या स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत ८८२३ मातांनी प्रसूतिपूर्व वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. त्यापैकी ३ हजार ४५५ मातांची मोफत प्रसूती करण्यात आली. महापालिकेने महत्त्वाकांक्षी अशी शहरी गरीब योजना सुरू केली आहे. याअंतर्गत गरीब घटकातील रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च महापालिकेकडून देण्यात येतो.
गेल्या ८ महिन्यात या योजनेअंतर्गत ७ हजार १७८ कुटुंबीयांनी लाभ घेतला आहे. नोव्हेंबरअखेर २०१५ पर्यंत आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारचे ६३० परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले, तर ११ नवीन परवाने देण्यात आले आहेत. नर्सिंग होमच्या २९३ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले, तर ८ नवीन नर्सिंग होमला परवाने देण्यात आले. बिबवेवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने सद्गुरू शंकर महाराज हा नवीन दवाखाना सुरू करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये पालिकेच्या वतीने सखाराम कुंडलिक कोद्रे प्रसूतिगृह मुंढवा, दळवी रुग्णालय शिवाजीनगर, राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे ३ ठिकाणी नव्याने सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यात आले. सध्या पालिकेची ९ सोनोग्राफी केंद्रे कार्यरत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गणेश पेठ येथे जुने मासळी मार्केट पाडून नवे मासळी मार्केट उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे, याकरिता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मत्सिकी विकास महामंडळाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. या मासळी मार्केटमध्ये गाळाधारकांना आरोग्यदृष्ट्या सर्व सोयी-सुविधा, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.