वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:20+5:302021-04-27T04:10:20+5:30
यवत ग्रामीण रुग्णालयात सद्य परिस्थितीत ७५ रुग्णांचे कोविड सेंटर चालविले जात आहे. रोजच वाढणारी रुग्ण संख्या यामुळे क्षमतेपेक्षा अधिक ...
यवत ग्रामीण रुग्णालयात सद्य परिस्थितीत ७५ रुग्णांचे कोविड सेंटर चालविले जात आहे. रोजच वाढणारी रुग्ण संख्या यामुळे क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अपुरे कर्मचारी, रुग्णांची वाढती संख्या, कोविड नमुने तपासणीसाठी रोज शेकडोच्या संख्येने जमणारी गर्दी असे असताना देखील तळमळीने चांगली सेवा देणाऱ्या डॉ. चेतन तुमाले, डॉ. घावटे, डॉ. जाधव यांच्यासह परिचारिका व कर्मचाऱ्यांचा सत्कार माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड व उपसरपंच सुभाष यादव यांनी रुग्णांसाठी रोज उकडलेली अंडी पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर खुटवड, रोहन दोरगे, मयूर दोरगे, विकास दोरगे, मंगेश रायकर, रुग्ण कल्याण समितीचे रमजान शेख उपस्थित होते.
अधिकच्या वैद्यकीय स्टाफची गरज ..
यवत ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णक्षमता वाढविण्यासाठी बाहेर मंडप टाकून विलगीकरण कक्ष सुरू केला जात आहे. मात्र सद्य परिस्थितीत रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण अधिक असल्याने कर्मचाऱ्यांवर अधिक ताण येत आहे. आता आणखी रुग्ण वाढल्यास कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढविणे आवश्यक आहे.
यवत ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना माजी आमदार रमेश थोरात व इतर मान्यवर.