हॉस्पिटलला आधाराची ‘सलाइन’
By admin | Published: June 28, 2017 04:20 AM2017-06-28T04:20:04+5:302017-06-28T04:20:04+5:30
येथील तारकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी पर्णकुटी चौकात गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेले स्वर्गीय राजीव गांधी हॉस्पिटल हे
लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : येथील तारकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी पर्णकुटी चौकात गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेले स्वर्गीय राजीव गांधी हॉस्पिटल हे सुरुवातीपासूनच आरोग्यविषयक कामकाजाच्या बाबतीत ‘मृत्युशय्ये’वर होते; मात्र महापालिका संचालित संबंधित रुग्णालय चऱ्होली बुद्रुक येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दंत वैद्यकीय महाविद्यालयाला चालविण्यासाठी देण्याच्या करारनाम्यास पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीमध्ये दाखल करण्यात आला होता. त्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याने आता येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटलला आधाराची ‘सलाइन’ मिळाली असल्याचे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही.
येरवडा येथे ३० बेडचे पेस्तनजी प्रसूतिगृह आणि बाह्य रुग्णविभाग (ओपीडी) असलेली इमारत अकरा वर्षांपूर्वी जुनाट झाली होती आणि मोडकळीस आली होती. महापालिकेने जुनी इमारत पाडून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सर्वोपचार रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन स्थानिक नगरसेवक शिवाजी क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सुमारे आठ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पाच मजली इमारतीच्या स्व. राजीव गांधी हॉस्पिटलचे उद्घाटन तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते २००७ मध्ये झाले होते. त्यावेळी दिवंगत पर्यटन राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार अॅड. चंद्रकांत छाजेड, तत्कालीन महापौर दीप्ती चौधरी उपस्थित होते.
येरवडा परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ससूनच्या धर्तीवर स्व. राजीव गांधी हॉस्पिटल सुरू करण्यात आले.