रुग्णालयाचा कचरा उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2015 03:56 AM2015-07-31T03:56:54+5:302015-07-31T03:56:54+5:30
पुणे जिल्ह्यातील शासनाचे सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि उरो रुग्णालयांमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नाही.
- राहुल कलाल, पुणे
पुणे जिल्ह्यातील शासनाचे सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या औंध येथील जिल्हा रुग्णालय आणि उरो रुग्णालयांमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नाही. या दोन्ही रुग्णालयांकडून घातक जैववैद्यकीय कचरा परिसरात उघड्यावर टाकण्यात येत असल्याने मानवी आरोग्यासह पक्षी, प्राणी यांच्या आरोग्यासही घातक असलेल्या या कचऱ्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काणाडोळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. पुणे जिल्हयासाठी औंध येथील काही एकर जागेमध्ये जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर या परिसरात क्षयरुग्णांंवर उपचारासाठी औंध उरो रुग्णालयही आहे. या दोन्ही रुग्णालयांची अवस्था दयनीय असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण संरक्षण कायदा केला आणि त्यात जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिली आहे. हा कायदा राज्यात राज्य शासनाकडून राबविण्यात येतो. जी खासगी रुग्णालये हा नियम पाळत नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. पण खुद्द सरकारच्या मालकीची असलेली रुग्णालयेच हा नियम पाळत नसल्याचे धडधडीत सत्य समोर आले आहे.
औंध रुग्णालयाच्या परिसरात जैववैद्यकीय कचरा जाळण्यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो बंद आहे. त्या भागातील मशीन गंजल्या असून, भागात झाडे उगवली आहेत. त्या विभागाबाहेर दोन्ही रुग्णालयांकडून जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला जात आहे.
यामध्ये रक्ताच्या पिशव्या, इंजेक्शन-सुया, रक्ताने माखलेले कापूस, बॅन्डेज, सलाईनच्या बाटल्या, शवागृहात वापरण्यात आलेला बर्फ, मुत्राच्या पिशव्या, क्षयरुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे मास्क आदींचा समावेश आहे. हा कचरा या परिसरात सुमारे १ एकर भागात पसरला आहे. हा कचरा पक्षी खात असल्याने त्यांच्या जिवीताचाही प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपालईन फुटल्या असून त्यांची अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यात दुषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जात आहे. मात्र त्याकडे रुग्णालय प्रशासनाने डोळेझाक केली आहे.
परिसरात दारूपार्ट्या
औंध उरो रुग्णालयाच्या परिसरातील रस्त्यांवर सायंकाळनंतर दारूपाटर्या भरत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर या रस्त्यांवर अंधाराचा फायदा घेऊन प्रेमी युगल बसतात. त्यामुळे या रस्त्यांवरून सायंकाळनंतर परिसरात राहणाऱ्या महिला व मुलींना ये-जा करणे अवघड जात आहे. मात्र, याकडे रुग्णालय प्रशासनासह पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
वसाहती मरणासन्न
रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिसरात वसाहत वसविण्यात आली आहे. ती बांधून अनेक वर्षे उलटून गेली आहेत आणि अनेक इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. या इमारतींची अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या
पडण्याच्या अवस्थेत आहेत.