रुग्णालयांमध्ये आता ‘धर्मादाय आरोग्यसेवक’
By admin | Published: July 15, 2016 12:45 AM2016-07-15T00:45:28+5:302016-07-15T00:45:28+5:30
शहर आणि जिल्ह्यातील खासगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य व गरीब रुग्णांना मोफत, सवलतीचे उपचार मिळवून देण्यासाठी आता शासनाच्याच वतीने या रुग्णालयांमध्ये धर्मादाय
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील खासगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य व गरीब रुग्णांना मोफत, सवलतीचे उपचार मिळवून देण्यासाठी आता शासनाच्याच वतीने या रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे आरोग्यसेवक सहधर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची माहिती सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी दिली. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून रुग्णालयांमधील गरीब रुग्णांची हेळसांड मांडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, धर्मादाय आरोग्यसेवकांची आता रुग्णांलयांमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे ६४ रुग्णालयांची धर्मादाय रुग्णालय म्हणून नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील बहुतेक सर्व पंचतारांकित रुग्णालयांचा समावेश आहे. धर्मादाय रुग्णालय म्हणून नोंद असलेल्या या सर्व रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना मोफत व पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के निधी या रुग्णालयांनी आयपीएफ फंड म्हणून राखीव ठेवणे आवश्यक आहे.
याबाबत येणाऱ्या गरीब रुग्णांना माहिती देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये स्वतंत्र एमएसडब्ल्यू झालेल्या व्यक्तींची आरोग्य सामाजिक सेवक यांची नियुक्ती करण्याचे बंधनकारक
करण्यात आले. त्यानुसार सध्या सर्व रुग्णालयांमध्ये या सामाजिक सेवकांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे.
नियुक्त केलेले सामाजिक सेवक रुग्णालयाचे कर्मचारी असल्याने येणाऱ्या गरीब रुग्णांना अनेक वेळा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आवश्यकतेपेक्षा अधिक कागदपत्रांची मागणी करणे, अनेक वेळा ते रुग्णालयामध्ये उपस्थितीतच नसतात, यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. लोकमतने आवाज उठविल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
ही बाब लक्षात घेऊन शासनाने सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाचे धर्मादाय आरोग्यसेवक यांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. यासाठी लवकरच स्वतंत्र भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती कचरे यांनी दिली.