वाढीव बिले देणा-या रुग्णालयांना आणले वठणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:30+5:302021-03-09T04:14:30+5:30
पुणे : कोरोनाच्या सर्वाधिक संसर्गाच्या काळात रुग्णांची अडवणूक करुन अव्वाच्यासव्वा बिले आकारणा-या खासगी रुग्णालयांना पालिकेने वठणीवर आणले. नोटीसा बजावत ...
पुणे : कोरोनाच्या सर्वाधिक संसर्गाच्या काळात रुग्णांची अडवणूक करुन अव्वाच्यासव्वा बिले आकारणा-या खासगी रुग्णालयांना पालिकेने वठणीवर आणले. नोटीसा बजावत तसेच प्रसंगी कारवाई करीत हजारो रुग्णांची आलेली वाढीव बिले करुन कोट्यवधींची रक्कम वाचविण्यात आली. पालिकेने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला.
शहरात कोरोनाची लागण सुरु झाल्यानंतर जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. या काळात रुग्णवाढीचा आलेख चढता होता. आॅक्टोबरनंतर जानेवारीपर्यंत हा आलेख खाली आला. जून ते सप्टेंबर या काळात रुग्णांना खासगी रुग्णालयात खाटा मिळणे अवघड झाले होते. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांना वाढीव बिले जात होती. या लुटीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने निकष तयार केले. त्यानंतर, पालिकेने यावर नियंत्रण आणण्याकरिता यंत्रणा उभारली. प्रत्यक्ष रुग्णालयात दीड लाखांपेक्षा अधिक बिले देणा-या रुग्णालयांकडून बिले आॅडीट करुन कमी करण्यात आली. तसेच, उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनी तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेऊन बिले करुन देण्यात आल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांनी दिली.
===
कोरोना बिलांची रक्कम कमी झाल्याची आकडेवारी
प्रकार मूळ रक्कम कमी केलेली रक्कम अंतिम बिल
रुग्णालयातच कमी झालेली बिले 15 कोटी 61 लाख 71 हजार 239 2 कोटी 71 लाख 77 हजार 246 12 कोटी 89 लाख 93 हजार 993
उपचारांपश्चात आलेल्या तक्रारी 76 लाख 95 हजार 706 58 लाख 46 हजार 287 19 लाख 11 हजार 170