तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुग्णालयांनी सज्ज राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:12 AM2021-05-11T04:12:28+5:302021-05-11T04:12:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली ...

Hospitals should be prepared for the possibility of a third wave | तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुग्णालयांनी सज्ज राहावे

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून रुग्णालयांनी सज्ज राहावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी लहान बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केल्या.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. या वेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त संतोष पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे सल्लागार तथा टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंके, डॉ. डी. बी. कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ससून रुग्णालयाच्या कोरोना चाचणी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.

राव म्हणाले की, पुणे विभागात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालके बाधित झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्माण करणे आवश्यक आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफने आपले कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने बजावले आहे. यापुढे देखील सर्व प्रकारच्या विशेषज्ञ डॉक्टरांनी कोरोना काळात सेवा द्यावी, असे आवाहन राव यांनी केले.

कोविड आजाराबरोबरच कोविड पश्चात उद्भवणाऱ्या आजारामध्ये देखील उपचार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबतही दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. संजय जोग म्हणाले की, बऱ्याचदा कोरोनाच्या रुग्णांना सरसकट रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन होणे गरजेचे आहे.

बालक, मातांसाठी वेगळा कक्ष

भारती हॉस्पिटलचे डॉ. संजय ललवाणी म्हणाले की, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करणे आवश्यक आहे. याबरोबरच बालरोगतज्ज्ञ, नर्स, औषधसाठा तयार ठेवणे गरजेचे आहे. याबरोबरच लहान बालकांसोबत येणाऱ्या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल, असे सांगितले. युनिसेफचे प्रतिनिधी प्रवीण पवार यांनी तिसऱ्या लाटेमधील लोकांमधील कोविडचा धोका कमी करण्यासाठी सहभाग्य पध्दतीने जाणीवजागृती कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Web Title: Hospitals should be prepared for the possibility of a third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.