वसतिगृहातील स्वयंपाकगृहे अस्वच्छच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2015 01:40 AM2015-12-22T01:40:40+5:302015-12-22T01:40:40+5:30
विद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्वच्छ स्वयंपाकगृहात शिजविलेले अन्न खाऊनच गुजराण करावी लागत
राहुल शिंदे/सायली जोशी, पुणे
विद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्वच्छ स्वयंपाकगृहात शिजविलेले अन्न खाऊनच गुजराण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले असून, बहुतेक शाळा-महाविद्यालयांत वॉटर प्युरिफायरच नसल्याने टाकीतून आलेले पाणीच प्यावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ पाहणीतून समोर आली आहे. यामुळे शहरातील वसतिगृहातील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सेवासदन संस्थेतील ५१ विद्यार्थिनींना वसतिगृहातील अन्नामुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने सेवासदन संस्थेला भेट दिली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या वसतिगृहात वॉटर प्युरिफायर बसविले नसल्याची नोंद घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी हुजूरपागा, पुणे विद्यार्थी गृह, स. प. महाविद्यालय व बीएमसीसी महाविद्यालयातील वसतिगृहातील मुलांच्या मेसमधील स्वयंपाकगृहाची पाहणी केली. त्यात हुजूरपागा वगळता एकाही ठिकाणी वॉटर प्युरिफायर व स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकीजवळच उरलेले अन्न टाकले जात असल्याचेही आढळले. त्यामुळे पाण्याच्या टाकीजवळचा परिसरही अस्वच्छ दिसला. शैक्षणिक संस्थाचालक कंत्राटदारांकडे सर्व जबाबदारी सोपवून निर्धास्त होतात. मात्र, संस्थाचालकांनी वेळोवेळी वसतिगृहाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वसतिगृहातील मुलांशी मेसबाबत विचारले असता जेवणाचा दर्जा चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसतिगृहातील सुमारे ६० ते ७० विद्यार्थीच मेसमध्ये जेवण करत असल्याचेही मेसचालकांनी सांगितले.
अस्वच्छतेने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाशिव पेठेतील वसतिगृहातील स्वयंपाकगृहात पाल फिरत असल्याचे दिसले. तसेच या ठिकाणी गव्हाचे पीठ उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुले खात असलेल्या अन्नाच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ही खोलीही अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसले. या ठिकाणी भिंती आणि जमीन अतिशय कळकट होती. भाज्या आणि इतर किराणा सामान ठेवण्यासाठी असलेल्या खोलीतही कचरा होता. या खोलीत मांजरींचाही यथेच्छ वावर होता. भाज्या उघड्या अवस्थेत ठेवलेल्या होत्या. इतकेच नाही तर साठवणीची खोली असताना कचरा टाकण्याच्या टोपल्याही या ठिकाणीच ठेवल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वॉटर प्युरिफायर नसल्याने विद्यार्थ्यांना टाकीत जमा होणारे पाणी प्यावे लागते. या ठिकाणी ५ वी ते १० वीचे २०० विद्यार्थी असून, त्यांच्या आरोग्याबाबत शाळा प्रशासन गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील पदाधिकारी वसतिगृहाला अचानकपणे भेट देऊन वसतिगृहात मेसमध्ये जेवण करतात. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात नेहमीच उत्तम जेवण मिळते. मुलांच्या वसतिगृहाबाबत तक्रारी असतील तर त्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या जातील. मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी ठोस पाऊल उचलले जाईल.
- विकास काकतकर, उपाध्यक्ष ,नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी