कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचारासाठी विद्यापीठांची वसतिगृहे प्रशासन ताब्यात घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:41 PM2020-03-20T13:41:08+5:302020-03-20T13:48:13+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
पुणे : कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध विद्यापीठांची व अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृह जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी नसली तरी पुढील काळात आवश्यकता भासल्यास सुमारे ४ ते ५ हजार रुग्णांना निगराणीखाली ठेवता येऊ शकेल, अशी तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास इतर महाविद्यालयांची वसतिगृहेसुद्धा ताब्यात घेतली जाऊ शकतात.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यापीठांची व अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठांशी व शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून वसतिगृहांमध्ये उपलब्ध असणाऱ्या खोल्यांची माहिती प्रशासनाकडे जमा केली आहे.
पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ म्हणाले, की विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठांची व अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या प्रामुख्याने मोठी वसतिगृहे ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील विद्यापीठ यांसह सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेतली जाणार आहेत. सुमारे ४ ते ५ हजार खोल्या ताब्यात घेण्याची प्रशासनाची तयारी आहे. पुढील काळात शहरातील इतर महाविद्यालयांची कमी क्षमतेची वसतिगृहे ताब्यात घेतली जाऊ शकतात.
............
विद्यापीठातील वसतिगृहे ताब्यात घेण्याबाबत विभागीय आयुक्तांशी गुरुवारी संवाद झाला. विद्यापीठाची सर्व वसतिगृहे प्रशासनाला देता येणार नाहीत. सध्या विद्यापीठातील वसतिगृहात अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी राहत आहेत. त्यांचे साहित्य वसतिगृहातील खोल्यांमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलेली वसतिगृहे सोडून गेस्ट हाऊस, सेट गेस्ट हाऊस व अॅकॅडमिक स्टाफ कॉलेजचे वसतिगृह देण्यास हरकत नसल्याचे प्रशासनाला कळविले आहे. विद्यापीठाकडून ७० ते ९छच्० खोल्या प्रशासनाला तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.