SPPU| पुणे विद्यापीठातील वसतिगृहे सोमवारपासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:40 PM2022-02-19T12:40:48+5:302022-02-19T12:42:13+5:30
पुणे : अनेक दिवसांपासून वसतिगृहाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहे पीएच.डी. व स्पर्धा ...
पुणे : अनेक दिवसांपासून वसतिगृहाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहे पीएच.डी. व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून (दि. २१) सुरू करण्यात येत आहेत.
तसेच इतर वसतिगृहेदेखील ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. दरम्यान, काही विद्यार्थी संघटनांनी याबाबत कुलगुरुंना निवेदन देऊन वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला यश आले आहे.
पीएच.डी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोल्या असल्याने या विद्यार्थ्यांसाठी २१ फेब्रुवारीपासून वसतिगृहे सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठाने आज प्रसिद्ध केले. कोरोना प्रादुर्भावामुळे वसतिगृहे बंद करण्यात आली होती. मात्र, प्रादुर्भाव कमी होऊनही विद्यापीठातील वसतिगृहे सुरू झाली नव्हती. परिणामी विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने वसतिगृह सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठाला केल्या.