राज्यातील हॉटेल व्यवसायाला मिळणार औद्योगिक दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:35+5:302021-06-02T04:10:35+5:30
कर रचनेचा होणार फायदा : नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाचे आवाहन (मुख्य बातमी) पुणे : हॉटेल व्यवसायाला औद्योगिकचा दर्जा ...
कर रचनेचा होणार फायदा : नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाचे आवाहन
(मुख्य बातमी)
पुणे : हॉटेल व्यवसायाला औद्योगिकचा दर्जा द्यावा, अशी अनेक वर्षांपासूनच्या हॉटेल व्यावसायिकांच्या मागणीला यश आले आहे. केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना वीज दर, वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर, विकास कर, वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक तसेच अकृषिक कराची आकारणी यापुढे औद्योगिक दराने करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी किमान मूलभूत दर्जा (Basic Minimum Satandards) प्राप्त करण्यासाठी राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी नोंदणी करावी, अशी सूचना राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने केली आहे.
पर्यटन व्यवसायातील आदरातिथ्य क्षेत्र हे मुख्य सेवा उद्योग आहे. राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच पर्यटन व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने परकीय चलन मिळण्याचे हे एक प्रमुख साधन असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आदरातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देण्याच्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या कराची आकारणी एप्रिल २०२१ पासून लागू करण्याची सूचना केली आहे. राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन पर्यटन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
---
चौकट
हॉटेल व्यावसायिकांनी नोंदणी कशी करायची?
शासनाच्या निर्देशानुसार अटी, निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलची तपासणी करण्यासाठी तीन शासकीय प्रतिनिधी तर दोन या क्षेत्रातील असोसिएशनचे प्रतिनिधी असे पाच जणांची समिती काम करणार आहे. या समितीचे अध्यक्ष हे उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय, पर्यटन संचालनालय, तर सदस्य म्हणून स्थानिक अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयाचे प्रतिनिधी, स्थानिक हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर आणि असोसिएशनचा एक प्रतिनिधी हे काम पाहणार आहेत.
-----
या संकेतस्थळावर करा अर्ज
शासनाच्या सवलतीकरिता हॉटेल नोंदणी/दर्जा मिळवण्यासाठी संबंधित हॉटेल व्यावसायिकाने सर्व कागदपत्रांसह www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज पर्यटन उपसंचालक यांनी पडताळणी करून अंतिम मंजुरीसाठी संचालकांकडे सादर करायचा आहे. संपूर्ण प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.