हॉटेलची झालीत मंगल कार्यालये, शासनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करतविवाह सोहळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:44+5:302021-01-21T04:10:44+5:30
चाकण पंचक्रोशीतील अनेक हॉटेल व्यवसायिकांनी राज्य शासनाच्या नियमानुसार पन्नास लोकांच्या नावाखाली विवाह सोहळे लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु या ...
चाकण पंचक्रोशीतील अनेक हॉटेल व्यवसायिकांनी राज्य शासनाच्या नियमानुसार पन्नास लोकांच्या नावाखाली विवाह सोहळे लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु या विवाह सोहळ्याना अगदी शंभर, दोनशे, तीनशे ते पाचशेच्यावर लोक अगदी दाटीवाटीने उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेक लोक मास्क न घालता असतात. हॉटेल व्यवसायिकांकडून राज्य शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली केली जात आहे. पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापेक्षा किती तरी जास्त लोक उपस्थितीत राहत आहेत.
मंगल कार्यालयात गर्दीत लग्न सोहळा संपन्न होत असल्यास त्यांच्यावर नियम मोडल्याचे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यामुळे मंगल कार्यालय मालक जास्त लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे विवाह सोहळे आयोजकांकडून हॉटेलांना पसंती दिली जात आहे. केवळ वेगळा मार्ग आणि हॉटेल किती लोक उपस्थित आहेत हे कोणालाही कळत नाही परंतु याउलट परिस्थिती असून शेकडो लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ पार पडत आहे. यामध्ये अनेक जण बिना मास्कचे असतात,दाटीवाटीने लोक बसल्याने सोशल डिस्टंस पळाले जात नाही. सॅनिटाइझर तर कुठेही दिसत नाही.राज्य शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे.
हॉटेल व्यवसायिकांनी केवळ धंदा मिळत असल्याने त्यांच्याकडून विवाह सोहळे आयोजकांना नियम पाळण्याची जबरदस्ती करत नसल्याचे चित्र लग्न सोहळ्यात गेले की दिसून येत आहे. मंगल कार्यालयाच्या निम्म्या पैशांत हॉटेलमधील लग्न पार पडत असल्याने हॉटेलाना पसंती दिली जात आहे. हॉटेलमध्ये केवळ नावालाच प्रवेशद्वारावर सॅनिटाइझर व टेंप्रिचर मशीन ठेवलं जातं मात्र त्याचा वापर करताना दिसत नाही.
राज्य शासनाने फक्त पन्नास लोकांच्याच उपस्थितीत विवाह सोहळे करण्यास परवानगी दिली आहे.मात्र या नियमाकडे दुर्लक्ष करून शेकडो लोकांच्या गर्दीत विवाह समारंभ आयोजित केले जात आहेत.यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरीही लोकांनी मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये असे गर्दीत लग्न समारंभ होत असतील तर त्याबाबत आमच्याकडे तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- प्रकाश धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण